नवापुरात युरियाची कृत्रिम टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:40+5:302021-07-17T04:24:40+5:30
युरियाच्या एका बॅगची किंमत सर्व करांसहित २७० रुपये आहे. परंतु तालुक्यात शेतकऱ्यांकडून ३०० ते ३२० रुपये वसूल केले जातात. ...
युरियाच्या एका बॅगची किंमत सर्व करांसहित २७० रुपये आहे. परंतु तालुक्यात शेतकऱ्यांकडून ३०० ते ३२० रुपये वसूल केले जातात. खताच्या किमतीबाबत शेतकऱ्याने वाद घातला तर विक्रेते युरिया उपलब्ध नाही, आम्ही विकत नाही, असे सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव चढ्या दरात युरिया खरेदी करावा लागतो. विशेष म्हणजे प्रत्येक हंगामातच काही कृषी विक्रेते युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करतात. त्यानंतर त्याची चढ्या भावाने विक्री करतात. यातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. या प्रकाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अमृत लोहार, नवापूर शहराध्यक्ष शरद पाटील हे कृषी विभागाकडे तक्रार करणार आहेत. शेतकऱ्यांची खतटंचाई व आर्थिक लूट होत आहे. यासंदर्भात कृषी विभागाने उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. कृषी विभागाने या प्रकरणी दखल घेऊन काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
विक्रेते करतात लिंकिंग
युरिया विकत घेताना काही कृषी केंद्रचालक शेतकऱ्यांना इतर खते किंवा कीटकनाशक विकत घेण्याची सक्ती करतात. इतर खते अथवा कीटकनाशक खरेदी केले तरच युरिया देतात. शेतकऱ्यांना केवळ युरियाची गरज असते. मात्र नाइलाजाने शेतकऱ्यांना युरियासोबत इतर खते विकत घ्यावी लागतात. कृषी केंद्र चालकांच्या या लिंकिंगवर कुणाचाही अंकुश नाही.
-अरविंद पाडवी, शेतकरी, पांघराण, ता. नवापूर
तालुक्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याची अथवा अधिक दराने विक्री होत असल्याची तक्रार शेतकऱ्याने केल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली जाईल. कोणत्याही शेतकऱ्याने अधिक किंमत देऊन युरिया खरेदी करू नये. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना समान युरिया खताचे वाटप केले जाईल. नवापूर शहर, चिंचपाडा, विसरवाडी या भागात युरिया खताचे वितरण सुरू झाले आहे, अन्य कृषी केंद्रांवरही लवकरच वितरण सुरू होईल.
- बापू गावीत, तालुका कृषी अधिकारी, नवापूर
नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य भावात युरिया खताचे वितरण केले जात आहे. जादा भावाने पैसे घेत नाही किंवा कोणतेही इतर औषध, कीटकनाशक घेण्याची सक्ती केली जात नाही. माझ्याकडे ५०० बॅग आल्या होत्या. २५० शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन बॅग देऊन युरिया खताचे वितरण केले आहे.
- चंद्रेश प्रजापत, डायमंड कृषी केंद्र, नवापूर