अडीच हजार विद्यार्थ्यांचा कलाविष्कार रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:03 PM2020-01-10T12:03:12+5:302020-01-10T12:03:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : युवारंग या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. १६ ते २० जानेवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : युवारंग या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. १६ ते २० जानेवारी दरम्यान होणाऱ्या युवा महोत्सवात विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १२५ महाविद्यालयातील सुमारे अडीच हजार युवक-युवतींसह व्यवस्थापक व मार्गदर्शकांचा समावेश आहे. युवारंगचा उद्घाटन सोहळा १७ जानेवारीला मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या स.इ. पाटील कला, गि.बा. पटेल विज्ञान आणि खरेदी-विक्री संघाचे वाणिज्य महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने युवारंगचे दुसऱ्यांदा विद्यापीठस्तरीय आयोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी नंदुरबार जिल्हास्तरीय युवारंगाचे यजमानपद भूषविण्याची संधीही महाविद्यालयाला मिळाली होती. गेल्यावर्षी जिल्हास्तरीय युवारंगच्या उद्घाटन समारंभात मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी विद्यापीठस्तरीय युवारंगच्या आयोजनाची जबाबदारी दिल्यास ती समर्थपणे पार पाडण्याचे आश्वासन दिले होते. विद्यापीठ प्राधिकरणाने शहादा महाविद्यालयावर युवारंगची जबाबदारी दिली असून मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, पी.आर. पाटील यांचे मार्गदर्शन व संचालक मंडळाच्या प्रोत्साहनाने महाविद्यालय युवक महोत्सवासाठी सज्ज झाले आहे.
विविध समित्या स्थापन
युवारंगच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील, युवक महोत्सव समन्वयक उपप्राचार्य डॉ.एम.के. पटेल यांनी विविध समित्यांची स्थापना केली आहे. समिती प्रमुखांसह प्रत्येकी दहा ते पंधरा सदस्यांची समिती बनविण्यात आली आहे. यात स्वागत, नोंदणी, निवास, भोजन, शिस्त, रंगमंच संचालन, छायाचित्रण, प्रसिद्धी, विद्युत पुरवठा, वाहनतळ आदी समित्यांचा समावेश आहे. समित्यांमार्फत योग्य नियोजन करण्यात आले असून नियोजनानुसार काम पार पाडले जात आहे.
सांस्कृतिक पथसंचलनाचे आकर्षण
युवक महोत्सवात सहभागासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. पाच दिवसीय युवारंग महोत्सवात सहभागी संघांचे आगमन व नोंदणी १६ जानेवारीला सकाळी आठ ते दुपारी एक या वेळात केली जाणार आहे. दुपारी दोन ते पाच या वेळात संघांचे सांस्कृतिक पथसंचलन होणार आहे. शहादा शहरातील स्टेट बँक चौकातील कृषीभवनापासून पथसंचलनास प्रारंभ होईल. मुख्य रस्त्याने बसस्थानक, गांधी पुतळा, नगरपालिका चौकमार्गे खेतिया रस्त्यावरील मिशन बंगला येथे संचलनाची समाप्ती होईल. या पथसंचलनात सहभागी विद्यार्थी वेगवेगळ्या कलाकृती सादर करतील. याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजता संघ व्यवस्थापकांची सभा होईल.
उद्घाटन व पारितोषिक वितरण
युवारंगचा उद्घाटन सोहळा १७ जानेवारीला सकाळी १० वाजता ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ तथा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील राहतील. या वेळी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, सचिव कमलताई पाटील, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू पी.पी. माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहील. तर पारितोषिक वितरण सोहळा २० जानेवारीला सकाळी १० वाजता होईल. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येतील. विद्यापीठस्तरीय युवक महोत्सव युवारंग २०१९-२० चा आनंद घेण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, पी. आर. पाटील, युवारंगचे कार्याध्यक्ष तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक बंडू पाटील, विद्यापीठाचे प्रकुलसचिव डॉ.बी.व्ही. पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सत्यजित साळवे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील, युवारंगचे समन्वयक उपप्राचार्य डॉ.एम.के. पटेल यांनी केले आहे.
युवक महोत्सवासाठी मंडळाच्या प्रांगणात पाच रंगमंच तयार करण्यात आले आहेत. यातील रंगमंच क्रमांक एकवर उद्घाटन व पारितोषिक वितरण सोहळा होईल. १७ जानेवारी रोजी रंगमंच एकवर मिमिक्री, विडंबन नाट्य, रंगमंच दोनवर भारतीय लोकगीत, रंगमंच तीनवर काव्यवाचन, रंगमंच चारवर शास्त्रीय वादन (सूरतालवाद्य), रंगमंच पाचवर रांगोळी व व्यंगचित्र स्पर्धा होतील. १८ जानेवारी रोजी रंगमंच एकवर विडंबन, मूकनाट्य, रंगमंच दोनवर सुगम गायन पाश्चिमात्य, समूहगीत, रंगमंच तीनवर वादविवाद, रंगमंच चारवर सुगम गायन भारतीय, शास्त्रीय गायन, रंगमंच पाचवर कोलाज, क्ले मोडेलिंग, स्पॉट पेंटींग स्पर्धा होतील. १९ जानेवारीला रंगमंच एकवर समूहनृत्य, रंगमंच दोनवर शास्त्रीय नृत्य, लोकसंगीत, रंगमंच तीनवर वक्तृत्व, रंगमंच चारवर फोटोग्राफी, रंगमंच पाचवर चित्रकला, इन्स्टॉलेशन, मेहंदी स्पर्धा होतील. सर्व स्पर्धा त्या-त्या रंगमंचावर दररोज सकाळी नऊ वाजता सुरू होतील. सहभागी स्पर्धकांच्या भोजनाची वेळ सकाळी ११ ते एक व रात्री सहा ते आठ दरम्यान राहील.