वीज कनेक्शनअभावी आश्रमशाळा इमारत निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 03:08 PM2018-09-20T15:08:34+5:302018-09-20T15:08:38+5:30
तळोदा एकात्मिक प्रकल्प : इमारत पूर्ण झाल्या पण वीज कनेक्शन नसल्याने हस्तांतरण रखडले
तळोदा : तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील चार शासकीय आश्रमशाळांचे बांधकाम पूर्ण होवून साधारण तीन ते चार वर्षे झाली आहेत. तथापि या इमारतींना वीज कनेक्शन जोडले नसल्याने त्यांचे हस्तांतरणदेखील रखडले आहे. परिणामी येथील विद्याथ्र्याना भौतिक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. निदान सलसाडी शाळेतील प्रकरणाची दखल घेवून आदिवासी विकास विभागाने हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी पालकांची अपेक्षा आहे.
तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणा:या भांगरापाणी, बिजरी, होराफळी व तालंबा अशा चार शासकीय आश्रमशाळांच्या इमारतींच्या बांधकामास आदिवासी विकास विभागाने प्रत्येकी साडेतीन कोटी अशा 14 कोटी रूपयांचा निधी मंजूर करून प्रत्यक्षात सन 2010 पासून इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. या इमारतींचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्या मार्फत करण्यात आले. परंतु बांधकाम पूर्ण होऊन जवळपास तीन ते चार वर्षे झाली आहेत. असे असतांना केवळ विद्युत जोडणीअभावी इमारतींचे हस्तांतरणदेखील रखडले आहे. परिणामी कोटय़ावधी रूपये शासनाने खर्च करूनही आदिवासी विद्याथ्र्याना पत्र्याच्या शेडमध्ये राहावे लागत आहे. वास्तविक इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याची मुदत संबंधीत विभागाने केवळ दोनच वर्षाची दिलेली असतांना आज आठ वर्षे झालेली आहेत. तरी देखील संबंधीत यंत्रणेच्या उदासिन धोरणामुळे आजही प्रकल्पाला ताब्यात मिळालेली नाही. इमारतीच्या हस्तांतरणासाठी तळोदा प्रकल्पाने सनबंधितांकडे गेल्या फेब्रुवारी महिन्यांपासून तगादा लावला आहे. आतादेखील त्यांना स्मरणपत्र पाठविले आहे. त्याचबरोबर या इमारती राहण्या योग्य आहेत की नाही याबाबतही शहादा बांधकाम विभाग व दक्षता गुणनियंत्रण विभागास लेखी कळविले आहे. त्याचाही खुलासा अद्याप देण्यात आला नसल्याचे प्रकल्पाचे म्हणणे आहे. आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने इमारतींच्या हस्तांतरणाबाबत मिळमिळीत भूमिका घेतल्यामुळेच संबंधीत यंत्रणा देत नसल्याचा पालकांचा आरोप आहे. सलसाडी आश्रमशाळेतील विद्याथ्र्याचा मृत्यूची घटना केवळ विजेचा शॉक लागून झालेली असतांना कनेक्शन जोडणीबाबत संबंधीत विभाग अजूनही ठोस कार्यवाही करायला तयार नाही.
या प्रकरणी पालकांमध्ये प्रशासनाबाबत तीव्र नाराजीचा सूर असून, इमारतींचे वीज कनेक्शन तातडीने पूर्ण करून हस्तांतरण करण्यासाठी संबंधितांना सक्त ताकीद द्यावी, अशी पालकांची मागणी आहे. अन्यथा या विरोधात पालकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.