वडाळी येथे ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 12:27 PM2021-01-01T12:27:02+5:302021-01-01T12:27:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील वडाळी येथे सोने-चांदी खरेदी-विक्रीची दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला. चोरी करण्याच्या प्रयत्नात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील वडाळी येथे सोने-चांदी खरेदी-विक्रीची दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला. चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांना आपणास कोणीतरी पाहत असल्याचे समजून आल्यानंतर त्यांनी गावातून पळ काढला. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच जवळील कोंढावळ या गावी घरातून दागिने व रोख रक्कम तसेच परिसरात डिझेल व पेट्रोल चोरीच्या घटना घडल्या आहेत.
वडाळी गावात मुख्य बाजारपेठेत चैतन्य ज्वेलर्स नावाचे दागिने खरेदी-विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास या दुकानासमोर चोरटे उभे असल्याचे समोर राहणा-या ग्रामस्थांना दिसून आले. दरम्यान, चोरटे कुलूप तोडत असल्याचे दिसून आल्यानंतर ग्रामस्थांनी गावात संपर्क करण्यास सुरुवात केली. चोरी करणा-या चोरट्यांना आपणास कोणीतरी पाहत आहे, असा सुगावा लागल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला. ग्रामस्थांनी रात्री पोलीस पाटलांना घटनेची माहिती कळवली. यावेळी माजी उपसरपंच अभय गोसावी, प्रदीप गिरीगोसावी, जयेश माळी यांनी गावातील युवकांना सोबत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनेची माहिती सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिली गस्तीवरील पोलीस पथकाने तातडीने शिरपूर ते शहादा आणि कोंढावळ ते बोराळा या रस्त्यांवर शोध सुरू केला; परंतु चोरटे मिळून आले नाहीत. दरम्यान, बाजारपेठेतील कापड दुकान व किराणा दुकानात लावलेल्या सीसी कॅमे-यात हा प्रकार कैद झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने गावात भेट देत माहिती घेतली. यामुळे वडाळी व परिसरात भीतीचे वातावरण आहे.