आठवडाभरात उपस्थितीत झाली 45 टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 12:37 PM2020-12-03T12:37:29+5:302020-12-03T12:37:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवनी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन आठवडा उलटला आहे. आता हळूहळू शाळांमध्ये विद्यार्थी संख्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवनी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन आठवडा उलटला आहे. आता हळूहळू शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढू लागली आहे. ५५ ते ६० टक्के विद्यार्थी उपस्थित राहू लागले असून आतापर्यंत जवळपास ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र भरून दिले आहे. दरम्यान, विविध कारणांमुळे अजूनही ७२ शाळा बंद असल्याचे चित्र आहे.
उत्तर महाराष्ट्रात केवळ नंदुरबार जिल्ह्यातीलच शाळा गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील भितीमुळे शाळांमधील उपस्थिती १० ते १५ टक्केच्या आत राहिली होती. नंतर शाळा भरण्याचे प्रमाण नियमित झाले आही विद्यार्थी व पालकांच्या मनातील भिती देखील कमी झाल्याने आता विद्यार्थी संख्या वाढली आहे. सद्य स्थितीत जवळपास ५५ ते ६० टक्केपर्यंत वाढली आहे. येत्या आठवड्यात उपस्थिती संख्या ही ८० टक्केच्या आसपास जाण्याची अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. शाळांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत.
माध्यमिक शाळांऐवजी कनिष्ठ महाविद्यालयांमधील उपस्थिती वाढत आहे. शाळांमधील अर्थात नववी व दहावीच्य वर्गात उपस्थिती ३५ ते ४५ टक्केच्या घरात आहे तर अकरावी व बारावी वर्गातील उपस्थिती ही ६५ ते ७० टक्केपर्यंत जात आहे.
कोरोना पॅाझिटिव्हमुळे काही शाळा बंद...
सुरू झालेल्या शाळांमधील काही शिक्षक कोरोना पॅाझिटिव्ह आल्याने अशा शाळांना सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यातील सहा शाळांचा समावेश आहे. सर्वच शाळांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असून पालकांनी विद्यार्थ्यांंना शाळेत पाठविणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील दुर्गम भागात ॲानलाईन शिक्षणाला अनेक अडचणी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. शाळांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निसंकोचपणे शाळांमध्ये उपस्थित राहावे.
-एम.व्ही.कदम, शिक्षणाधिकारी
अशी आहे उपस्थिती...
बुधवार, २ डिसेंबर रोजी एकुण विद्यार्थी १४,१७८ पैकी ७,१०९ विद्यार्थी उपस्थित होते. एकुण ४,१४१ शिक्षकांपैकी २,३८६ शिक्षक उपस्थित. १,१५८ शिक्षकेतरांपैकी १,१५५ शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित.