पालिकांच्या कामाचा लेखा-जोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:44 AM2017-10-02T11:44:34+5:302017-10-02T11:44:40+5:30
विभागीय उपायुक्तांची पाहणी : पालिकांनी केलेल्या कामाबाबत व्यक्त केले समाधान
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत पालिकेने राबविलेल्या शहरातील शौचालयांबरोबरच परिसराची पाहणी नाशिक विभागीय उपायुक्तांनी केली. या वेळी त्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान त्यांनी नंदुरबार, नवापूर व शहादा येथेदेखील भेट दिली होती.
शासनाने यंदा स्वच्छता हाच विकास हे अभियान राबविण्याचे नियोजन केले होते. हे अभियान 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान राबविण्यात आले. तळोदा पालिकेने या अभियानांतर्गत लोकसहभागाच्या माध्यमातून शहरात स्वच्छता मोहिम हाती घेतली होती. पालिकेने शहरातील सर्व परिसराची साफ सफाई केली होती. जिल्ह्यातील पालिकांनी राबविलेल्या स्वच्छता अभियानांची पाहणी करण्यासाठी नाशिक विभागाचे उपायुक्त प्रविण गिरी यांनी शुक्रवारी तळोदा पालिकेला भेट दिली. या वेळी मुख्याधिकारी जनार्दन पवारयांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी परिसराची पाहणी केली. शिवाय पालिकेने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली. त्याचबरोबर पालिकेच्या बागेच्या, नवीन वसाहतीतील रिकाम्या जागा व खर्डी नदीच्या संरक्षण भिंतीची पाहणी केली. या वेळी स्वच्छतेबाबत नागरिकांशी संवाद साधला. जास्तीत जास्त लोकसहभाग वाढविण्याची सूचनाही त्यांनी या वेळी दिली. दरम्यान त्यापूर्वी त्यांनी नंदुरबार, नवापूर व शहादा येथील पालिकांनाही भेट देवून स्वच्छता अभियानाची पाहणी केली होती. त्यांचा बरोबर जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे, तहसीलदार योगेश चंद्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी ए.पी. सोनवणे, विस्तार अधिकारी संजय पाटील, बी.के. पाटील, पुरवठा निरीक्षक रमेश वळवी आदी उपस्थित होते.