वीज व पाणी बचतीसाठी केले स्वयंचलित डिव्हाईस तयार, तळोद्यातील विद्यार्थ्याचा शोध : कृषिपंप चालू करण्यासाठी झाले सोयीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:36 AM2021-09-17T04:36:18+5:302021-09-17T04:36:18+5:30

तळोदा : कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद असल्याने या फावल्या वेळेचा सदुपयोग करत शालेय विद्यार्थ्यांनी पाणी व विजेच्या ...

Automatic device made to save electricity and water, search for student in the bottom: Convenient to turn on the agricultural pump | वीज व पाणी बचतीसाठी केले स्वयंचलित डिव्हाईस तयार, तळोद्यातील विद्यार्थ्याचा शोध : कृषिपंप चालू करण्यासाठी झाले सोयीचे

वीज व पाणी बचतीसाठी केले स्वयंचलित डिव्हाईस तयार, तळोद्यातील विद्यार्थ्याचा शोध : कृषिपंप चालू करण्यासाठी झाले सोयीचे

Next

तळोदा : कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद असल्याने या फावल्या वेळेचा सदुपयोग करत शालेय विद्यार्थ्यांनी पाणी व विजेच्या व्यवस्थापनासाठी आपल्या शेतातील कृषिपंपाला स्वयंचलित डिव्हाईस बसवून पाण्याची अन् विजेची मोठी बचत केली आहे. विशेष म्हणजे सध्या या भागात हिंस्त्र प्राण्यांची भीती असल्यामुळे रात्री-अपरात्री शेतात जाऊन वीजपंप सुरू करण्याची गरज उरली नसल्याचे या शोधामुळे शक्य झाले आहे. तळोदा शहरातील योग सूर्यकांत पजराले हा डाॅ. सूर्यकांत व डाॅ. स्नेहल पजराले या डाॅक्टर दाम्पत्याचा मुलगा आहे. मुळातच त्याला वेगवेगळे ॲप्स बनविण्याची अतिशय आवड असल्यामुळे खेळांचे इतर ॲप्स तयार केले आहेत. सध्या कोरोनाच्या कालावधीत गेल्या दीड, दोन वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे अशा फावल्या वेळेचा सदुपयोग करत लॅपटॅाप, टॅबवर वेगवेगळे प्रयोग करत असतो. त्यातच वडील स्वतःच्या मालकीची शेती कसत असतात. त्यामुळे पिकाला पाणी देताना मोठी कसरत करत असतात. कारण कृषिपंप चालू करण्यासाठी रात्री, बेरात्री कधीही शेतात जात असतात. अशावेळी जंगली श्वापदांच्या परिसरातील वावरामुळे मोठी भीती मनात असते. साहजिकच ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन शिवाय पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन, त्याचा जोडीला विजेची बचत करण्यासाठी आपण स्वयंचलित डिव्हाईस तयार करावा, असा निश्चय त्याने केला होता. ही कल्पना त्याने आपल्या आई, वडिलांना पटवून दिली. त्यांनीही त्याला प्रोत्साहित केले. त्यामुळे योगने स्वयंचलित डिव्हाईस तयार करण्यास सुरुवात केली. यासाठी बाजारातून काही इलेक्ट्रॉनिक वस्तू व राॅ मटेरियल आणून हा डिव्हाईस तयार केला. त्याला कृषिपंपाच्या स्टार्टरला बसवला. त्यातून कूपनलिका सुरू- बंद करण्यासाठी ‘फार्मर हेल्पर’ नावाचे ॲप विकसित केले. हा डिव्हाईस व ॲपच्या माध्यमातून घरूनच कृषिपंप सुरू-बंद करता येऊ लागला. त्यामुळे तो घरूनच वीज आल्यावर कृषिपंप सुरू करत आहे. साहजिकच यामुळे पाण्याचे व विजेचे सुयोग्य व्यवस्थापन करता येत असल्याचे योग म्हणतो. त्याच्या या अभिनव प्रयोगाचे कौतुक केले जात आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनीदेखील त्याच्या या प्रयोगाची माहिती जाणून घेतली. सध्या पावसामुळे हा डिव्हाईस त्याने बंद केला आहे.

१४० ॲप्स केेले तयार

असे १४० ॲप त्याने विकसित केले आहेत. योग पजराले याला संगणकीय कोडींग बनविण्याची विशेष आवड असल्यामुळे त्याने कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्यामुळे त्याचा फायदा उठवत आपले लक्ष ॲप्स बनविण्यावर केंद्रीत केले. त्याने साधारण १४० ॲप्स तयार केले आहेत. यात खेळाची ॲप्स अधिक असली, तरी कोरोना मीटर व न्युट्रिशियन फूड सप्लीमेंट नावाची महत्त्वाची ॲप्सदेखील तयार केली आहेत. त्याचा या ॲप्सची वैद्यकीय व्यवसायातील अनेक डॉक्टरांनी माहिती जाणून घेतली आहे. त्याच्या या ॲप्सचा उपयोग डाॅक्टर असलेल्या त्याच्या आईला अधिक होत आहे.

वाढत्या भारनियमनाने कृषिपंपाच्या पाण्याचे नियोजनदेखील कोलमडले आहे. त्यातच अधून-मधून खंडित वीज पुरवठा होत असल्यामुळे कृषिपंप सुरू करण्यासाठी वडिलांना शेतात हेलपाटे मारावे लागत होते. यामुळे पाण्याच्या व्यवस्थापनावर मोठा परिणाम होत असतो. हे लक्षात घेऊन फार्मर हेल्पर ॲपच्या माध्यमातून स्वयंचलित डिव्हाईस तयार करून त्याच्या माध्यमातून घरूनच कृषिपंप सुरू-बंद करता येतो. त्यामुळे पाण्याचे नियोजन करून त्याचे व्यवस्थापन करता येते.

- योग पजराले, डिव्हाईस निर्माता, तळोदा.

Web Title: Automatic device made to save electricity and water, search for student in the bottom: Convenient to turn on the agricultural pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.