बोलीभाषेतील लोकगीते व काव्यातून कोरोनाची जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:55 PM2020-03-23T12:55:28+5:302020-03-23T12:55:36+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या विषाणूजन्य आजारापासून बचावासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी स्थानिक ...
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या विषाणूजन्य आजारापासून बचावासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी स्थानिक कवींनीही पुढाकार घेतला असून आपल्या बोलीभाषेतील कविता आणि गीतांमधून लोकजागृती होत आहे. विशेषत: सोशल मिडीयातून त्याचा प्रसार केला जात असून जनमानसातून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यात विशेषत: आदिवासी, गुजर आणि अहिराणी भाषिक समाजाची संख्या अधिक आहे. त्यामुळे याच भाषेतून कविता व साहित्याद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रशासनानेही त्यासाठी पुढाकार घेतला असून साहित्यिक व कवीही पुढे सरसावले आहेत. अनेक रसिकांनी संत आणि नामांकीत कवींच्या कविता आणि राष्टÑभक्ती गीतेही या काळात लोकांपर्यंत पोहोचवून कोरोनाच्या जागृतीचा संदेश देत आहेत. त्यात विशेषत: विं.दा. करंदीकरांची ‘माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वत:ला जिंकणे एवढे लक्षात ठेवा...’ ही कविता सध्या सोशल मिडियात अधिक लोकप्रिय ठरली आहे.
खास करून खटवाणी, ता.अक्कलकुवा येथील बानूबाई जिऱ्या वसावे यांनी आदिवासी भाषेतील तयार केलेले कोरोना लोकजागृतीचे गीत अधिकच लक्षवेधी ठरले आहे. ‘जा जा कोरोना बिमारी दूर रेहेजे भाऊ...’ या गीताची व्हीडीओ क्लीप सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. त्या गीतातून त्यांनी ‘तुम्ही सारे भाऊ-बहीण समजून घ्या व कोरोनावर उपाययोजना करा, हात धुवा, एकमेकांमधील अंतर ठेवा, गरम पाणी प्या, तोंडावर कपडा बांधा, आजारी असाल तर डॉक्टरांकडे जा’ असे विविध संदेश आपल्या खास बोलीभाषेतील लोकगीतातून दिला आहे. लोकसंघर्ष मोर्चाच्या त्या कार्यकर्त्या असून त्यांच्यासोबत सुमित्रा वसावे व इतर कार्यकर्तेही आदिवासी बोलीभाषेतून प्रबोधन करीत आहेत.
त्याचबरोबर अहिराणी भाषेतूनही जनजागृती होत आहे. त्यात शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन यांची व्हीडीओ क्लीप लक्षवेधी ठरली आहे. अहिराणी भाषेतून त्यांनी जागृतीचे संदेश दिले आहेत. यासह स्थानिक कवींनीही विविध कविता आणि चारोळ्यातून त्याबाबत जनजागृतीचा प्रयत्न केला आहे.
गुजर भाषेतील कवी मोहन पाटील यांनी ‘जीवन छे अनमोल भाई, कोरोना करेछे कहर...’ या कवितेतून तसेच कवी जगन्नाथ पाटील यांनी ‘नो कोरोना-नो परोना, नई जोडेना-नयी कोरेना...’ अशा कवितांतून जनजागृती करण्याबाबत प्रयत्न केला आहे. या कवितांना सोशल मिडियावर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.