पाण्यासाठी ग्रामस्थांचे रात्रभर जागरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:06 AM2019-06-05T11:06:16+5:302019-06-05T11:06:20+5:30
राधेश्याम कुलथे । लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील गोदीपूर गावाला पाणीपुरवठा करणारी कूपनलिका आटल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला ...
राधेश्याम कुलथे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील गोदीपूर गावाला पाणीपुरवठा करणारी कूपनलिका आटल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर शेतातील खाजगी कूपनलिकेतून ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे. मात्र दिवसा वीजपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत आहे.
शहादा तालुक्यात पाणीटंचाईने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक नळ योजना कूचकामी ठरल्या असून बंधारे, गाव तलाव आटले आहेत. संपूर्ण तालुक्यात ही परिस्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर ग्रामस्थ पाणी कुठून आणतात? टंचाईच्या काळात ते दिवस कसे काढतात? प्रशासन त्यांच्या मदतीला धावले का? या सर्व प्रश्नांवर शहादा तालुक्यातील गोदीपूर येथे पाहणी केली असता या गावात सर्व कूपनलिका कोरडय़ा झालेल्या दिसून आल्या. येथील ग्रामस्थांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, दिवसा वीजपुरवठा होत नसल्याने रात्री नऊ वाजता गावाजवळील अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर शेतातील वीजपुरवठा सुरू होतो. तेथे रात्री पाणी भरण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याठिकाणी रात्री दहा वाजेच्या सुमारास भेट दिली असता सर्व गोदीपूर गाव आजूबाजूच्या शेतात पाणी भरण्यासाठी तुटून पडलेले दिसून आले. जवळील अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात रात्री वीज आल्यावर पाण्यासाठी लगबग करावी लागते. महिला-पुरुषांसह आबालवृद्ध व लहान मुले डोक्यावर हंडे घेऊन शेताच्या दिशेने निघतात.
पाण्यासाठी रात्र जागून काढल्याने अनेकवेळा दिवसा काम करणे शक्य होत नाही. परिणामी आर्थिक झळही सहन करावी लागत आहे. निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी फक्त मते मागण्यासाठी येतात. आता ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे मात्र कोणत्याही पक्षाचा पुढारी उपाययोजनेसाठी फिरकत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया एका वृद्ध महिलेने व्यक्त केली. प्रशासनाने गोदीपूर येथील पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.