ग्रामीण भागात स्वच्छाग्रही करताहेत जाणीव जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:18 PM2020-04-16T12:18:52+5:302020-04-16T12:19:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छाग्रहींची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छाग्रहींची नियुक्ती करण्यात आली आहे़ ग्रामीण स्तरावर हे स्वच्छाग्रही ग्रामीण भागात स्वच्छ हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक करुन दाखवत जाणीव जागृती करत आहेत़ यातून ग्रामस्थांमध्ये वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व वाढत आहे़
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजनांना वेग देण्यात येत आहे़ यात ग्रामीण भागासाठी अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे़ यांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक तसेच इतर प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गावागावात औषध फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि स्वच्छाग्रही यांच्यामार्फत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी जाऊन ग्रामस्थांमध्ये मास्क लावणे , हात धुणे, तोंडाला नाकाला रुमाल बांधणे, सामाजिक अंतर राखणे याविषयी जाणीव जागृती करण्यात येत आहे. ग्रामपंचायतस्तरावर कोरोना हद्दपार करण्यासाठी स्वच्छाग्रहींना सहभागी करून घेणेबाबत राज्यस्तरावरून सूचना प्राप्त होत्या. त्यानुसार पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गट संसाधन केंद्राच्या कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छाग्रहींना या आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेऊन गावात काम करण्याचे प्रशिक्षण दिले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील स्वच्छाग्रहींनी ग्रामीण भागात काम सुरु केले आहे़ यात प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करुन ग्रामीण भागात कोरोनाला लांब ठेवण्याबाबत सांगितले जात आहे़
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर स्वच्छतेविषयक बाबींवर प्रशासनाला सहकार्य करणे करीता व स्वच्छते विषयक ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत एक किंवा दोन स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आदेश ूदेण्यात आले होते़ यांतर्गत आतापर्यंत ५८६ ग्रामपंचायतींमध्ये १ हजार १४८ स्वच्छाग्रही नियुक्त झाले आहेत़ त्यांच्याकडून दिवसभरात त्या-त्या गावांमध्ये भेटी देऊन स्वच्छतेविषयी माहिती देण्यात येत आहे़ खासकरुन स्वच्छाग्रही म्हणून नियुक्त असलेले प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करत आहेत़ यातून हात धुणे आणि स्वच्छता राखणे यावर प्रबोधन होत आहे़ ग्रामीण भागात शिक्षित युवकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला असून गावातील महिला आणि युवतीही पुढे येत आहेत़ येत्या काळात कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी स्वच्छाग्रहींचे कार्य प्रभावीपणे कामी येणार असल्याचे बोलले जात आहे़
स्वच्छाग्रहींकडून ग्रामस्थांच्या गृहभेटींवर सर्वाधिक भर दिला जात आहे़
या भेटीतून सामाजिक अंतर राखणे, खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, मास्क वापरणे ,हात धुणे याविषयी वैयक्तिकरीत्या किंवा इतर कर्मचाऱ्यांसोबत सोबत माहिती देण्यात येत आहे़
सर्वच ठिकाणी प्रारंभी स्वच्छाग्रही ग्रामस्थांना हात धुण्याची पद्धत, हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत़
ग्रामपंचायतीमार्फत वाटप करण्यात येत असलेले मास्क व सॅनेटायझरचे वाटप करण्याच्या कामातही स्वच्छाग्रही पुढाकार घेतला आहे.
ग्रामस्थांमध्ये शौचालय वापर, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता याविषयी माहिती देण्यावर भर दिला जात आहे़
जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोनाबाबत भिती आहे़ या मोहिमेमुळे ग्रामस्थांमध्ये कोरोनाबाबत असलेले गैरसमज व भिती दूर होऊन सोशल डिस्टन्सिंगचा प्रचार आणि प्रसार होत आहे़