बालिका दिनानिमित्त जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:33 PM2020-01-25T12:33:15+5:302020-01-25T12:33:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय बालिका दिन सप्ताहानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातर्फे ‘बेटी बचाओ, बेटी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्ट्रीय बालिका दिन सप्ताहानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातर्फे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत जनजागृतीपर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी शपथ घेतली.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, आदिवासी भागात मुलगा आणि मुलगी असा भेद केल जात नाही. या समाजात महिलांचा सन्मान केला जातो. मुलींच्या जन्माचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे या मोहिमेसाठी नंदुरबार आदिवासी समाजाचा आदर्श इतरांनी घ्यावा. मात्र त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाला महत्व देण्याची गरज आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. सकाळी नेहरु पुतळा, गांधी पुतळा, जुनी नगरपालिका मार्गे प्रभातफेरीचा नेहरु पुतळ्याजवळ समारोप झाला. प्रभातफेरी दरम्यान पथनाट्याद्वारे मुलींना शिक्षण देण्याचा व भ्रृणहत्या रोखण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी आमदार राजेश पाडवी, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. राम रघुवंशी, विधी सेवा प्राधिकारणाचे सचिव सतीश मलिये, महिला बालविकासचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बापूराव भवाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद वळवी, गट विकास अधिकारी अशोक पटाईत, तालुका वैद्यकीय अधिकारी जे. आर. तडवी, डॉ. राजेश वळवी आदी उपस्थित होते. पाडवी यांनी यावेळी गावागावात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्याचे आवाहन केले.रॅलीत अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.