दुसऱ्या दिवशीही शाळेकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 11:53 AM2020-11-25T11:53:46+5:302020-11-25T11:53:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शाळा सुरू झाल्या, परंतु ग्रामिण भागातून शहरी भागात येण्यासाठी प्रवासी वाहनेच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शाळा सुरू झाल्या, परंतु ग्रामिण भागातून शहरी भागात येण्यासाठी प्रवासी वाहनेच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भिती आहे. यामुळे विद्यार्थी उपस्थितीवर देखील परिणाम होत आहे. शाळांकडून पालकांचे हमीपत्र भरले जात असून त्यात पालकांनी स्वत:च्या जबाबदारीवर पाल्याला पाठवीत असल्याचे नमुद केले आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी देखील विद्यार्थी उपस्थिती अत्यल्पच राहिली.
शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने विचार केलेला नाही. शहरी भागातील किंवा जेथे शाळा आहे तेथील स्थानिक विद्यार्थी शाळेत जाऊ शकतील, परंतु ग्रामिण तसेच लांबवरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र परवड होत आहे. ग्रामिण भागातील एस.टी.बससेवा अद्याप सुरू झालेली नाही. मानव विकास मिशनच्या बसेस सुरू करण्याबाबतही अद्याप नियोजन नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून ॲानलाईन शिक्षणानंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले. जिल्ह्यात या वर्गातील तब्बल ७२ हजार ६०६ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याचे आवाहन शाळांनी सोशलमिडिया तसेच वैयक्तीकरित्या दूरध्वनी करून केले. परंतु पहिल्या दिवशी १५ टक्के विद्यार्थी देखील उपस्थित राहू शकले नाहीत. दुस-या दिवशीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. पहिल्या दिवशी जेवढ्या शाळा उघडल्या तेवढ्याच शाळा दुस-या दिवशीही सुरू झाल्या होत्या.
अप-डाऊनचे हाल
शहरी भागात किंवा शाळेपासून दूर अंतरावर राहणार-या विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी प्रवासी वाहन उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. दररोज खाजगी वाहनाने येणे व जाणे गरीब कुटूंबातील विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. शिवाय असे वाहने वेळेवर उपलब्ध होतील याची शाश्वती नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
विद्यार्थीनींसाठी मानव विकास मिशनच्या बसेस सुरू करण्यासंदर्भात देखील अद्याप काहीही नियोजन झालेले नाही. जर ग्रामिण भागात एस.टी.सेवा सुरू झालीच तर विद्यार्थी कोरोनाविषयक किती आणि कशी काळजी घेऊ शकतील हा देखील प्रश्नच आहे. त्यामुळे पालक वर्ग धास्तावला आहे.
हमीपत्राबाबत नाराजी
अनेक शाळा पालकांचे हमीपत्र भरून घेत आहेत. हमीपत्रातील मजकुराविषयी मात्र अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालकांनी स्वत:च्या जबाबदारीवर पाल्याला शाळेत पाठवत असल्याचे त्यात नमुद आहे. शाळांनी व प्रशासनानेही याबाबत जबाबदारी स्विकारावी अशी अपेक्षा काही पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे देखील अनेक पालक आपल्या पाल्यांना अद्यापही शाळेत पाठविण्याबाबत राजी होत नसल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थी उपस्थिती न वाढण्याचे ते देखील एक कारण असल्याचे बोलले जात आहे.
७२ हजार विद्यार्थी...
जिल्ह्यात नववी ते १२ वीचे एकुण ७२ हजार ६०६ विद्यार्थी आहेत.
पहिल्या दिवशी अवघे ४.२ टक्के तर दुस-या दिवशी हे प्रमाण ८ टक्केपर्यंत गेले होते.
ग्रामिण भागातून शहरी भागात शाळेत येणा-या विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्यासाठी एस.टी.बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
- शिक्षकेतरही पॅाझिटिव्ह
- नववी ते १२ वीला शिकविणा-या शिक्षकांची संख्या ४,१४१ आहे. त्यापैकी ३,०४२ शिक्षकांची स्वॅब तपासणी झाली. त्यात २० शिक्षक पॅाझिटिव्ह आले आहेत.
- शिक्षकेतर कर्मचा-यांची संख्या १,१५८ आहे. त्यापैकी ३१२ जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यात २ जण पॅाझिटिव्ह निघाले. त्यांची टक्केवारी ०१ टक्के आहे.
- २५ टक्के शिक्षकांची चाचणी बाकी : चाचणी करून घेणा-या शिक्षकांची टक्केवारी ७३.५ टक्के आहे तर त्यातील पॅाझिटिव्ह आलेल्या शिक्षकांची टक्केवारी ०.७ टक्के आहे.