बालाजीनगर परिसर मुलभूत सुविधांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:38 PM2019-07-02T12:38:52+5:302019-07-02T12:38:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नगरपालिकेने तातडीने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी प्रभाग पाचमधील नागरिकांनी जिल्हाधिका:यांना साकडे घातले आहे. शहादा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : नगरपालिकेने तातडीने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी प्रभाग पाचमधील नागरिकांनी जिल्हाधिका:यांना साकडे घातले आहे. शहादा नगरपालिकेचे मतदार असूनही शहर हद्दीत नसल्याने पालिका प्राथमिक सुविधा पुरवत नसल्याची तक्रार तलाठीनगर, बालाजीनगर, कुबेरनगर, शिवसुंदरम् नगर या परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिका:यांकडे केली आहे.
शहादा शहराला लागून असलेल्या तलाठीनगर, बालाजीनगर, कुबेरनगर, शिवसुंदरम्नगर आदी परिसरातील जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांना निवेदन देऊन पालिकेकडून वीज, पाणी, रस्ते या सुविधा मिळण्याची मागणी केली आहे. हा सर्व परिसर पालिकेच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये येतो. या परिसरातील नागरिक पालिकेचे मतदार आहेत मात्र हा परिसर पालिका हद्दीत नसल्याने पालिकेकडून प्राथमिक सुविधा मिळत नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वखर्चाने कूपनलिका करून पाण्याची सोय केली आहे. मात्र यापैकी अनेक कूपनलिका आता बंद पडल्याने या भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने पालिकेने तातडीने या भागातील पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी आहे. या भागात खासदार डॉ.हीना गावीत यांच्या निधीतून गेल्या दोन वर्षापासून हायमस्ट लॅम्प बसविण्यात आले आहेत. मात्र पालिकेतर्फे वीज जोडणी न करण्यात आल्याने त्याचा उपयोग होत नाही. याबाबत पालिकेकडे पाठपुरावा करूनही पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आमदार उदेसिंग पाडवी यांनी गेल्यावर्षी या भागात पथदिवे बसविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तेही पूर्ण झाले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रभागातून निवडून गेलेले नगरसेवकही आमच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या भागातील पाणीटंचाईची समस्या त्वरित न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे. निवेदनावर उत्तम चौधरी, दिलीप चौधरी, नरेंद्र चव्हाण, बन्सी राजपूत, भालचंद्र शुक्ल, पंढरीनाथ सोनवणे, अशोक भदाणे, विक्की रावताळे, जंगेश पाटील, केवलराम चौधरी, प्रेम पाटील आदींच्या सह्या आहेत.