जिल्ह्यात वाळव्याच्या पावसाने केळीचे नुकसान; शेतकरी हवालदिल
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: April 28, 2023 07:54 PM2023-04-28T19:54:45+5:302023-04-28T19:54:55+5:30
मात्र भाव प्रचंड घसरल्याने आधीच केळी उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यातच या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळी पिकाचे नुकसान केले आहे.
नंदुरबार - जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी, जयनगर व सारंगखेडा परिसरात झालेल्या गारपीट व वाळव्याच्या पावसाने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात तीन वेळा वाळव्याचा पाऊस झाला. गुरुवारी मात्र मध्यरात्रीनंतर काही भागात मुसळधार पाऊस व गारपीट झाल्याने हा पाऊस पिकांसाठी जास्त धोकेदायक ठरला.
विशेषत: ब्राह्मणपुरी, भागापूर, जयनगर, वडाळी, टेंभातर्फे सारंगखेडा, फेस यासह इतर गावांना हा पाऊस झाला. या भागात केळीचे पीक मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या केळीची काढणी सुरू आहे. मात्र भाव प्रचंड घसरल्याने आधीच केळी उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यातच या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळी पिकाचे नुकसान केले आहे. अनेक केळीची झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या पावसामुळे जयनगर-वडाळी रस्त्यावरील झाडेही उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.