बँक कर्ज देत नसल्याने शेतकरी चढला टॉवरवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:55 AM2018-05-30T06:55:51+5:302018-05-30T06:55:51+5:30
बँकेकडून शेतीकर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने उद्विग्न झालेला एक युवा शेतकरी मोबाइल टॉवरवर चढल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.
नंदुरबार : बँकेकडून शेतीकर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने उद्विग्न झालेला एक युवा शेतकरी मोबाइल टॉवरवर चढल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. गोपाळ नगरातील या प्रकारामुळे जिल्हा व तालुका प्रशासनाची एकच धावपळ उडाली.
दुपारी दीडच्या सुमारास तुकाराम भिका पाटील (३५, रा़ कार्ली, ता़ नंदुरबार) हा शेतकरी धुळे चौफुली लगतच्या गोपाळनगर भागातील मोबाइल टॉवरवर चढला. त्याने लिहिलेली ५ पानी चिठ्ठी जमलेल्या लोकांना सापडली. चिठ्ठीवर नाव आणि पत्त्यासह मोबाइल क्रमांक होता़
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाटील यास मोबाइलवरून समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्ज मंजूर होणार नाही, तोवर खाली येणार नाही; प्रसंगी आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने दिली़ अखेर नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांनी जिल्हा बँकेतून मंजूर करण्याबाबत जिल्हाधिकारी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर साडेतीनच्या सुमारास पाटील खाली उतरला.