बाप्पा मिठाई विक्रेत्यांना पावला, मात्र गणेशभक्तांवर रुसला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:38 AM2021-09-16T04:38:30+5:302021-09-16T04:38:30+5:30
नंदुरबार : साखरेच्या दरात फारशी वाढ झालेली नसताना मिठाईचे दर मात्र १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. मिठाईच्या वाढलेल्या ...
नंदुरबार : साखरेच्या दरात फारशी वाढ झालेली नसताना मिठाईचे दर मात्र १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. मिठाईच्या वाढलेल्या दराला गॅसचे व इतर वस्तूंचे वाढलेेले दर कारणीभूत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सणासुदीच्या दिवसातच मिठाईच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गणरायाच्या आगमनासोबत मिठाईचे दरदेखील वधारले आहे. सध्या बाजारात ज्या केशरी पेढ्याचे मोदक बनतात, त्या केशरी पेढच्याच्या दरात प्रतिकिलो १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे तर इतर मिठाईच्या दरातदेखील साधारणतः दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर वाढले आहे. आधी ११०० रुपयांना मिळणारे व्यावसायिक गॅस सिलिंडर आता १३०० रुपयांना मिळत आहे. तसेच इतर कच्च्या मालाच्या दरातदेखील वाढ झाली आहे. दुधाच्या दरात काही महिन्यांपासून वाढ झाली आहे. त्यासोबतच ड्रायफ्रूट मिठाईसाठी लागणाऱ्या सुकामेव्याच्या दरातही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मिठाईचे दर वाढले वाढणे स्वाभाविक असल्याचे एका विक्रेत्याने स्पष्ट केले.
सणासुदीच्या काळात भेसळीवर लक्ष हवे
सणासुदीच्या काळात बोगस मावाची आवक मोठ्या प्रमाणावर होते. गुजरात राज्यातून मावा मागविला जातो. त्याच्या गुणवत्तेबाबत नेहमीच ओरड असते. त्यामुळे मिठाई घेताना नागरिकांनी भेसळीकडे लक्ष द्यावे. तसेच विविध पदार्थांची गुणवत्ता तपासून मगच घ्यावे. भडक रंगावरून भेसळ ओळखता येते. सणांच्या काळात भेसळ विरोधात मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली.
सणासुदीच्या काळात मिठाईचे दर वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे घरीच विविध मिठाई करण्यावर भर दिला जात आहे. बाजारात मिळणारी मिठाई भेसळीची नसेलच हे कशावरून. त्यामुळे आरोग्यही सांभाळावे लागते. -तुकाराम पाटील.
साखरेचे दर स्थिर असताना मिठाईचे भाव वाढविण्यात आले आहेत. वास्तविक सणासुदीच्या काळात मिठाईचे भाव स्थिर पाहिजे. सद्या गणेशोत्सवात मावा मोदकला मागणी आहे. परंतु त्याचेच भाव वाढले आहेत. -शारदा पाटील.