नर्मदा काठावरील गावांमध्ये बार्जद्वारे गस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:47 PM2020-04-22T12:47:35+5:302020-04-22T12:47:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सरदार सरोवरच्या पाणलोट क्षेत्र अंतर्गत नर्मदा नदीकाठच्या गावांमध्ये बार्जच्या सहाय्याने पोलिसांचे विशेष गस्ती पथक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : सरदार सरोवरच्या पाणलोट क्षेत्र अंतर्गत नर्मदा नदीकाठच्या गावांमध्ये बार्जच्या सहाय्याने पोलिसांचे विशेष गस्ती पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात हे पथक कार्यरत असणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी दिली
जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील अनेक गावे ही नर्मदा नदीच्या काठावर वसलेली आहे. त्याचप्रमाणे हा भाग मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांच्या सीमेलगत आहे. कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या आदेशान्वये लॉकडाऊन परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये परजिल्ह्यातील नागरिकांना नंदुरबार जिल्ह्यात प्रवेशास मनाई करण्यात आली असल्याने या भागात हे पथक तैनात करण्यात आले आहे.
शेजारच्या गुजरात व मध्य प्रदेश राज्यात कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात नंदुरबार शहर वगळता इतरत्र कोठेही कोरोना संक्रमित रुग्ण नसल्याने सर्वत्र विशेष खबरदारी बाळगली जात आहे. जिल्ह्याच्या सीमा सीलबंद करण्यात आल्या असून सर्वत्र विशेष सीमा तपासणी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील अनेक गावे या दोन राज्यांच्या सीमेलगत असल्याने या भागातून गुजरात व मध्य प्रदेशातील नागरिकांनी महाराष्ट्रात व नंदुरबार जिल्ह्यात अवैधरीत्या प्रवेश घेऊ नये यासाठी नर्मदा काठावर विशेष बार्ज तैनात करण्यात आली आहे. या बार्जवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली धडगाव पोलिसांचे विशेष सीमा तपासणी पथक कार्यरत असणार आहे. दरम्यान, नर्मदा नदीकाठच्या भूषा पॉर्इंट या अतिदुर्गम भागातील गावात वैद्यकीय विभागामार्फत विशेष तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. नर्मदा नदीद्वारे या भागाकडे येणाºया गावकऱ्यांची या विशेष केंद्रात वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.