जलसंपदा विभागात 60 रिक्त पदांमुळे कामांना अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:04 PM2019-06-29T13:04:08+5:302019-06-29T13:04:15+5:30
नरेंद्र गुरव । लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागात नंदुरबारअंतर्गत येणा:या चार उपविभागात तब्बल 60 पदे ...
नरेंद्र गुरव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागात नंदुरबारअंतर्गत येणा:या चार उपविभागात तब्बल 60 पदे रिक्त असल्याने विविध कामे रखडली आहेत. कामे वेळेवर होण्यासाठी पदे तातडीने भरण्याची गरज आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जल संपदा यांत्रिकी विभाग नंदुरबार अंतर्गत नंदुरबार, दोंडाईचा, उपसा सिंचन उपविभाग दोंडाईचा व द्वार उभारणी उपविभाग धुळे हे चार उपविभाग येतात. या चारही उपविभागामध्ये तब्बल 60 पदे रिक्त आहे. त्यात उपकार्यकारी अभियंता एका पदाचा समावेश असून उपविभागीय कार्यालयात वेतन प्रदान करणे, कार्यकारी अभियंता गैहजर असतांना त्यांचे काम पाहणे ही जबाबदारी उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे असते. मात्र हे पद रिक्त असल्याने कामावर ताण पडत आहे. उपअभियंता पदाची चार पदे मंजूर आहेत पैकी तीन पदे रिक्त आहेत. चार उपविभागांना एक उपअभियंता पाहिजे पैकी फक्त दोंडाईचा यांत्रिकी विभागात एक उपअभियंता आहे. नंदुरबार, धुळे, उपसा सिंचन दोंडाईचा याठिकाणी हे पद रिक्त आहे. सहायक अभियंता श्रेणी-2 ची दोन पदे मंजूर आहेत पैकी एक रिक्त आहे. शाखा अभियंता श्रेणी-2 ची 17 पदे मंजूर असून त्यापैकी नऊ पदे रिक्त आहेत. सहायक अभियंता नसल्याने कार्यालय कोण सांभाळेल? साईटवर भेटी कोण देईल? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रथम लिपिकाचे एकच पद असून तेही रिक्त आहे. वरिष्ठ लिपिक आठ पदे मंजूर आहेत पैकी सहा पदे रिक्त आहेत. प्रत्येक उपविभागाला दोन वरिष्ठ लिपिक मंजूर आहेत मात्र सहा पदे रिक्त असल्याने कामांना अडथळा येत आहे. कनिष्ठ लिपिकांची 13 पदे मंजूर आहेत मात्र त्यातील 11 पदे रिक्त आहेत. यामुळे पत्र टाईप करण्यासाठी कनिष्ठ लिपिक नसल्याने कामांना उशीर लागतो. कधी कधी तर बाहेरून पत्र टाईप करण्याची वेळ या कार्यालयांवर येते. टंकलेखकाची सहा पदे मंजूर आहेत पैकी एक पद रिक्त आहे. आरेखकाचे, अनुरेखक व भांडारपाल ही प्रत्येकी एक पद एक मंजूर असून तिन्ही पदे रिक्त आहे. उपआवेक्षकाची तिन्ही पदे रिक्त आहेत. वाहन चालकांचीही सर्व म्हणजे पाच पदे रिक्त आहेत. त्यामुळे विभागाचे मशिनरी पोकलेन, जेसीबी, डंपर, टिमर यांना चालवण्यासाठीही चालक नाही. कार्यकारी अभियंता यांच्या वाहनावरही चालक नसल्याने त्यांना तात्पुरता खाजगी चालकांची सोय करावी लागते. दप्तरी, नाईक ही प्रत्येकी एक मंजूर असलेली पदे रिक्त असून 11 शिपाई पदांपैकी नऊ रिक्त जागा आहेत. कार्यालयात शिपाईच नसल्याने टेबलांवर, संगणकावर नेहमी धूळ असते. चौकीदाराची सहापैकी पाच पदे रिक्त असल्याने कार्यालय व आवारातील वस्तू चोरीला जात आहेत. या विभागाला 86 पदे मंजूर असताना केवळ 26 पदांवर कार्मचारी नेमणुकीला असून त्यांच्यावरच या विभागाचा गाढा सुरू आहे. त्यामुळे या कर्मचा:यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याने तेही त्रस्त झाले आहेत. या विभागाकडून वरिष्ठांना दर महिन्याला स्मरणपत्र पाठवून रिक्त जागा भरण्याची मागणी केली. मात्र याबाबत कुणीही लक्ष देत नाही.