रस्त्यावर कोणी वाद घालत असेल तर सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:34 AM2021-09-22T04:34:12+5:302021-09-22T04:34:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : रस्त्यावर उभे असताना किंवा वाहन चालवताना कट मारला, जवळ येऊन जोरात हॉर्न वाजवला किंवा ...

Be careful if someone is arguing on the street | रस्त्यावर कोणी वाद घालत असेल तर सावधान

रस्त्यावर कोणी वाद घालत असेल तर सावधान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोठार : रस्त्यावर उभे असताना किंवा वाहन चालवताना कट मारला, जवळ येऊन जोरात हॉर्न वाजवला किंवा साईड दिली नाही, अशा शुल्लक कारणांवरून वाद घालून गाडी थांबून लूट करण्याचा प्रकार अलीकडच्या काळात वाढलेला दिसून येत आहे. अशा कारणावरून जाणीवपूर्वक वाहनधारकांसोबत वाद निर्माण करून त्यांची लूट करणे किंवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्या मोबदल्यात आर्थिक देवाणघेवाण करून वाद मिटवणाऱ्या टोळ्या अनेक ठिकाणी सक्रिय झाल्या असल्याच्या अनुभव आहे. त्यामुळे अशा घटना अनेकदा आपसात मिटवल्या जात असल्याने त्यांची पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद नसल्याचे दिसून येते.

सोमवार रात्री नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावर खापर ते तळोदादरम्यान चालत्या ट्रक (क्रमांक एमएच ४० - एके ४८९५) मधून कपड्यांचे गठ्ठे रात्री चोरीला गेले असल्याची घटनादेखील घडली आहे. ही ट्रक गुजरात राज्यातून कपड्याचे गठ्ठे घेऊन औरंगाबादकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात तळोदा पोलिसांनी या प्रकाराची चौकशी केली असल्याचे समजते. काही महिन्यांपूर्वीच प्रकाशा ते वाका चार रस्तादरम्यान काही दुचाकीस्वारांना अज्ञात चार-पाच जणांनी रोखून त्यांची लूट केल्याची घटना घडली होती. अशाच घटना वाका चार रस्ता ते तळोदा दरम्यानदेखील घडल्याच्या अनुभव आहे. या दरम्यान तर चार चाकी वाहनधारकांना अडवून लूट करण्याचा प्रयत्न केले आहेत. हातोडा पुलाच्या निर्मितीनंतर तळोदा ते नंदुरबारचे अंतर कमी झाल्यामुळे रात्री-बेरात्री प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच संधीचा फायदा घेत लुटमार करणाऱ्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचा अनुभव आहे. दरम्यान, वाकाचार रस्ता ते हातोडा हा गुजरात राज्यात येणारा भाग असून, अनेकदा राज्याच्या व पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या तांत्रिक अडचणींमुळे अशा घटना पोलीस ठाण्यापर्यंत येत नाही. शिवाय हा सीमावर्ती भाग असून, या भागातून गुटखा, दारू व पेट्रोलची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. किरकोळ गुटखा, दारू, पेट्रोल विक्रेत्यांना दिवसाढवळ्या गाठून त्यांचीदेखील लूट केली गेली असल्याचा अनुभव आहे. दरम्यान हे सर्व पदार्थ अवैध व प्रतिबंध असलेले असल्याने लूट झालेली व्यक्ती या प्रकाराबाबात जाहीर वाच्यता करताना दिसून येत नाही.

असे तुमच्या बाबतीत देखील घडू शकते

१) तुम्ही जर एकटे किंवा कुटुंबासह प्रवास करत असाल तर अनोळखी व्यक्तीने हात दिला किंवा लिफ्ट मागितली किंवा गाडी पंचर आहे, ना दुरुस्त झाली आहे, अशा कारणाने मदत मागणाऱ्यांपासून सावध राहा. अशा व्यक्तींना मदत करताना विचारपूर्वक करा. सध्याच्या डिजिटल जगात अडचणीत असणारी व्यक्ती मोबाईलद्वारे कोणालाही सहज संपर्क करून किंवा मेकॅनिकला संपर्क करून बोलावून घेऊ शकतो व आपली गैरसोय टाळू शकतो. पण अशाप्रकारे मदत मागून वाटसरू वाहनधारकांना थांबवून लूट करण्याची आखलेली ही योजनादेखील असू शकते.

२) रात्री-अपरात्री किंवा निर्जन स्थळी प्रवास करत असताना रस्त्यात लाकूड टाकून किंवा अन्य कारणाने रस्ता अडवला गेला असेल तर अशावेळी समयसूचकता व प्रसंगावधान दाखवणे गरजेचे असते. गाडीतून खाली उतरून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करू नये. शक्य झाल्यास तत्काळ वाहन फिरवून अशा निर्जन ठिकाणाहून परतणे केव्हाही हिताचे ठरेल.

Web Title: Be careful if someone is arguing on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.