निवडणुकीच्या वादातून मारहाण व जाळपोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:36 AM2020-01-10T11:36:58+5:302020-01-10T11:37:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/अक्कलकुवा : जिल्हा परिषद निवडणुकीचे कवित्व आता सुरू झाले असून वाद-विवाद, हाणामारी आणि एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार/अक्कलकुवा : जिल्हा परिषद निवडणुकीचे कवित्व आता सुरू झाले असून वाद-विवाद, हाणामारी आणि एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल होत आहेत. अक्कलकुवा येथे शिवसेना कार्यालयातील वस्तू जाळल्याचा प्रकार उघड झाला. त्यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. याच प्रकरणी प्रतिबंधीत आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल असून नंदुरबारात मतमोजणीच्या दिवशी दोन गटात वाद झाल्याने पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर झाल्यानंतर गावागावत वादविवाद सुरू झाले आहेत. याप्रकरणी आतापर्यत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन
जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असतांनाही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी १० ते १५ जणांविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप विजयी उमेदवार कपिल चौधरी व त्यांच्या समर्थकांनी मिरवणुकीची कुठलीही परवाणगी न घेता घोषणा देत जमावाने जावून कायद्याचे उल्लंघन केले. याप्रकरणी पोलीस नाईक अमोल खवळे यांच्या फिर्यादीवरून कपिल भरत चौधरी व इतर १२ ते १४ जणांविरुद्ध जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक डी.डी.पाटील करीत आहे.
शिवसेना कार्यालयात जाळपोळ
अक्कलकुवा येथे शिवसेना कार्यालयातील वस्तू जाळल्याप्रकरणी शिवसेना जि.प.सदस्य शंकर पाडवी यांच्या फिर्यादीवरून भाजप पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जि.प.सदस्य कपिल चौधरी यांच्यासह भाजप पदाधिकारी यांचा संशयीत आरोपींमध्ये समावेश आहे. अक्कलकुवा येथे मुख्य रस्त्यावर शिवसेनेचे शाखा कार्यालय आहे. बुधवारी रात्री कार्यालयातील खुर्ची व इतर सामान जळाल्याचे लक्षात आले. सकाळी या प्रकारामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता. याबाबत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य शंकर आमशा पाडवी यांनी फिर्याद दिली आहे. निवडणुकीत अक्कलकुवा गटातून भाजपचे कपील चौधरी हे निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्याला व कार्यकर्त्यांना डिवचले, जातीवाचक टिप्पणी केली. रात्रीच्या वेळी त्यांनीच कार्यालय जाळल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून कपिल भरत चौधरी यांच्यासह भरत देवराम चौधरी, विश्वास उखाजी मराठे, भगवान देवराम चौधरी, डिंपल भरत चौधरी, भरत रवींद्र मोरे, महेश परशुराम तोवर, संदीप राजेंद्र मराठे, जयेश भगवान चौधरी, रोहित विश्वास मराठे, मयूर विश्वास मराठे यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतमोजणी केंद्राबाहेर मारहाण
मतमोजणी केंद्राबाहेर निवडणुकीच्या वादातूनच आपसात मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत होळतर्फे रनाळे येथील व्यंकट दगा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भैय्या मराठे व गिरीश मराठे आणि इतर सहा ते सात जणांनी होळतर्फे रनाळे येथे गावात का आले होेते यासंदर्भात जाब विचारून मारहाण करून शिविगाळ केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून जमावाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अशोक गावीत करीत आहे.
दरम्यान, निवडणूक निकालानंतर होणारे वादविवाद लक्षात घेता पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त वाढविला आहे.
राजकीय वादावादी आणि मारहाणीच्या घटना लक्षात घेता पोलिसांनी मनाई आदेशात आणखी वाढ केली आहे. शिवाय पोलीस बंदोबस्त देखील कायम राहणार आहे. यंदा सर्वच गट व गणांमध्ये चुरशीच्या व अतितटीच्या लढती झाल्या होत्या. त्यामुळे वादविवाद देखील झाले होते. परिणामी यापुढे या वादातून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जाणार असून कुणी कायदा हातात घेतल्यास कडक कारवाईचा ईशारा देण्यात आला आहे.