क्रांतीची मशाल पेटवीत विद्रोही साहित्य संमेलनाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:45 PM2017-12-24T12:45:44+5:302017-12-24T12:46:30+5:30
भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरसिंग महाराज साहित्यनगरी (शहादा) : देशातील श्रमिक आणि शोषित समाजाचे साहित्य हे खरे साहित्य आहे . ते पुढे आले पाहिजे त्या साहित्यामुळे देशात क्रांती निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन 13 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा नजूबाई गावीत यांनी केले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारमंचावर ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, स्वागताध्यक्ष वाहरू सोनवणे, डॉ.बाबूराव गुरव, संयोजन समितीचे अध्यक्ष अरविंद कुवर, अभिनेते राजकुमार तांगडे, जेलसिंग पावरा, प्राचार्य विश्वास सायनाकर, सम्यक विद्रोही प्रबोधन संस्थेचे के.डी. शिंदे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य उपाध्यक्ष विजय मांडके, कार्याध्यक्ष धनाजी गुरव, जि.प.चे उपाध्यक्ष सुहास नाईक, जयसिंग माळी, सुनील गायकवाड, प्रसेनजित गायकवाड, कुमार शिराळकर, सदाशिव मकदूम, सुरेश इंद्रजित, प्रमोद नाईक, संजय लोहकरे, सुभाष पाटील, देवीदास शेंडे आदी उपस्थित होते.
संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते क्रांतीची मशाल प्रज्वलित करून करण्यात आले. प्रारंभी शहादा शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. प्रास्ताविक अनिल कुवर यांनी केले. संयोजन समितीचे अध्यक्ष अरविंद कुवर यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर मान्यवरांचे स्वागत साहित्य सामेलन समितीच्या वतीने करण्यात आले.
संमेलनाचे उद्घाटक संजय आवटे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेची निर्मिती करताना लोकशाहीची मूल्ये अधोरेखित केली होती. त्यात ते म्हणाले होते की, शासन व्यवस्थेला विरोध करणारे विरोधक हवेत, आज मात्र विरोध नावाला आहे. दुसरा मुद्दा सारासार विवेक प्रत्येकाने विवेकाने वागून राज्य घटनेचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्यानंतर संवैधानिक नैतिकता ही न्याय यंत्रणेत समानता हवी आज मात्र याउलट स्थिती आहे. न्यायमूर्ती लोया हत्येचा उलगडा झालेला नाही या गंभीर घटनेचा साधा उल्लेख माध्यमांकडे आलेला नाही. लोकशाहीचे चारही मुद्दे धोक्यात आले असताना आपण संविधानाच्या साहाय्याने पुढे जाऊन लढा दिला पाहिजे. आज सत्तेत असलेले सरकार जर पुढच्यावर्षी निवडून आले तर 2024 मध्ये निवडणुका होणार नाहीत, असे आपण गृहीत धरले पाहिजे. केंद्रातील सरकारकडून दाखवली जाणारी पाकिस्तान आणि मुस्लिमांची भीती व मतांचे जातीतून होणारे ध्रुवीकरण या देशाच्या एकतेला घातक आहे .
संमेलनाचे स्वागतध्यक्ष वाहरू सोनवणे यांनी सांगितले की, शहादा ही फुले, शाहू, आंबेडकर, अंबरसिंग महाराज यांचा वारसा असणारी भूमी आहे. विद्रोह म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा तोडफोड नव्हे तर विद्रोह म्हणजे अन्यायाविरोधात केलेले व समता बंधूता माणुसकीच्या लढय़ासाठी केलेले बंड आज सर्वानी धर्माधतेच्या विरोधात लढले पाहिजे. त्याचबरोबर कालबाह्य विचारांना टाकून देण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
या वेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सचिव गौतम कांबळे यांनी आपल्या मनोगतातून विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलनाची भूमिका मांडली. ते म्हणाले की, देशात सध्या मोठय़ा प्रमाणात धार्मिक उन्माद फोफावला आहे. त्याच्याविरोधात सर्वानी संघटित होऊन लढा देणे गरजेचे आहे. पुरोगामी म्हणवणा:या महाराष्ट्रात नरेंद्र दाभोलकरांचा, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांचा खून झाला. विचार संपविण्यासाठी हे खून झाले. परंतु माणूस मारून विचार संपत नाहीत. ते विचार अधिक प्रभावीपणाने रुजविण्यासाठी हे संमेलन आहे. या संमेलनात असणारा तरुण-तरुणींचा सहभाग हा पुरोगामी आणि परिवर्तनवादी तसेच विद्रोही चळवळीसाठी आश्वासक आहे.
अभिनेता राजकुमार तांगडे म्हणाले की, आजचा काळ खूप धोकेदायक आहे. राज्य सत्तेच्या विरोधात थोडे जरी बोलले तरी लगेच त्याला देशद्रोही ठरविण्यात येते. राजसत्ता हा सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर प्रभाव टाकणारा प्रमुख घटक आहे. त्याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. सूत्रसंचालन किरण मोहिते यांनी तर आभार सुनील गायकवाड यांनी मानले.