कोरोनाचा फायदा, शुभंकरोती पाठ अन् नमाजाचे पठण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:34 AM2021-09-22T04:34:10+5:302021-09-22T04:34:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणू संक्रमणाचे थैमान जारी असल्याने एक ते १४ या वयोगटातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणू संक्रमणाचे थैमान जारी असल्याने एक ते १४ या वयोगटातील लहान मुलं घरातच आहेत. या कालावधीत मुलं घरीच असल्याने आपल्या मुलांवर धर्मानुसार संस्कार रुजवणे अधिक सोपे झाले आहे. प्रत्येक धर्मात जीवन जगताना विविध संस्कार महत्त्वपूर्ण असतात. या संस्कारानुसार मनुष्य आपले जीवन जगत असतो. प्रत्येक धर्मात जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत विविध संस्कारांना महत्त्व आहे. साधारणत: जन्मापासून वयाच्या विविध टप्प्यात विविध प्रकारचे संस्कार केले जातात. आजच्या धावपळीच्या जगात आपल्या पाल्यावर पूर्वीप्रमाणे धार्मिक संस्कार करणे अवघड बाब असली तरी कोरोना कालावधीच्या काळात मुलं घरी असल्याने त्यांच्यावर आपल्या धार्मिक प्रथेनुसार संस्कार करणे सोपे झाले आहे. मुळात प्रत्येकाकडे वेळेचा अभाव असल्याने धार्मिक संस्कारांकडे अलीकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रत्येक पालकाने या कालावधीचा सदुपयोग करीत आपापल्या धर्मानुसार बालकांवर संस्कार करून त्यांना संस्काराचे महत्त्व पटविणे गरजेचे आहे.
प्रत्येक धर्मातील संस्काराचे धडे
हिंदू
सोळा संस्कार हे हिंदू धर्मीयांचे संस्कार विधी आहेत. हे संस्कार मानवी मूल्याशी निगडित बाब आहे. गर्भधारणेपासून ते विवाहापर्यंत हिंदू व्यक्तीवर, आई-वडील व गुरूंकडून ज्या वैदिक विधी केल्या जातात त्यास संस्कार असे म्हटले जाते. सात्त्विक वृत्तीची जोपासना व्हावी हा संस्कार विधी करण्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे.
मुस्लिम
पैदाइश, खत्ना, बिस्मिला, निकाह व वफात हे मुख्य संस्कार मुस्लिम धर्मात आहेत. याशिवाय
नमाज नियमानुसार दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणे. रोजा-रमजान महिन्यादरम्यान उपवास करणे. जकात- गरीब आणि गरजू लोकांना दान करणे. हज- मक्काला जाणे हे प्रमुख कर्तव्य आहेत.
ख्रिश्चन
या धर्मात संस्कारांना ‘साक्रमेंत’ असे संबोधले जाते. साक्रमेंत म्हणजे दैवी जीवन आपल्यात घेणे. ख्रिस्त जीवनात सहभागी होणे. म्हणजेच, चांगल्या कृती अंगी बाणवणे, निर्मळ विचार करणे. ‘बाप्तिस्मा’, ‘दृढीकरण’, ‘कम्युनियन’, ‘पश्चात्ताप’, ‘अत्याभंग’, ‘गुरुदीक्षा’, ‘विवाह’ हे सात साक्रमेंत किंवा संस्कार चर्चकडून दिले जातात.
पुजारी म्हणतात
हिंदू धर्मात संस्काराला महत्त्व आहे. जीवन जगताना संस्कार का केले जातात याचे महत्त्व कळते. मनुष्यामध्ये असलेल्या सद्गुणांचा विकास व संवर्धन करणे तसेच दोषांचे निराकरण करणे हा संस्कारांचा पाया आहे. प्रत्येक हिंदू माणसाने आपल्या मुलांवर संस्कार केलेच पाहिजे. हिंदूंच्या पूर्वजांनी मानवजातीच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी संस्कारांची योजना केली आहे. संस्कार हा साधनेचाही विषय आहे.
काजी म्हणतात
पवित्र कुराण हा इस्लाम धर्माचा प्रमुख व पायाभूत धर्मग्रंथ आहे. इस्लामधर्मीय लोक या ग्रंथाला प्रत्यक्ष परमेश्वराचा (अल्लाचा) शब्द मानतात. अल्लाने त्याचा प्रेषित मोहम्मद पैगंबरामार्फत हा ग्रंथ संपूर्ण मानवजातीसाठी बोधला, अशी इस्लामची धारणा आहे. इस्लामच्या धारणेनुसार कुराण परमेश्वराने पाठवलेला अंतिम व सर्वोच्च धर्मग्रंथ आहे. प्रत्येक मुस्लिमाने याचे पठाण करून त्यानुसार जीवन जगताना आचरण करणे आवश्यक आहे.
ब्रदर म्हणतात
ख्रिश्चन धर्माला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. येशू ख्रिस्त ख्रिश्चन धर्माचे संस्थापक असून, त्यांनी पवित्र बायबल या ग्रंथामधून ख्रिस्ती धर्म आणि कशा पद्धतीने आपले जीवन जगावे हे सांगितले आहे. बायबल हा ईश्वरप्रेरित ग्रंथ मानला जातो. हा ग्रंथ ख्रिस्ती श्रद्धेची व जीवनाची प्रेरणा देणारा, धर्माची मूलभूत तत्त्वे आणि ईश्वरी तारणाचा इतिहास समजून देणारा ग्रंथ आहे. प्रत्येक ख्रिश्चन नागरिकाने या संस्कारांचे पुरेपूरपणे पालन करणे आवश्यक आहे.