सावधान, मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुण्याची साथ वाढतेय घरोघरी साथीच्या आजाराचे रुग्ण, पालिकेने फवारणी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:36 AM2021-09-17T04:36:49+5:302021-09-17T04:36:49+5:30
डेंग्यूची लक्षणे डेंग्यूच्या लक्षणांमध्ये अचानक उच्च-ताप येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांच्या मागे वेदना होणे, सांधेदुखी होणे, अती थकवा येणे, ...
डेंग्यूची लक्षणे
डेंग्यूच्या लक्षणांमध्ये अचानक उच्च-ताप येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांच्या मागे वेदना होणे, सांधेदुखी होणे, अती थकवा येणे, शारीरिक वेदना होणे, भूक हरवणे आणि त्वचेवर पुरळ येणे यांचा समावेश होतो. ताप आणि इतर लक्षणं जवळजवळ एक आठवडे टिकतात; परंतु त्यानंतर येणारा अशक्तपणा आणि भूक कमी होणे अनेक आठवडे टिकू शकते.
चिकुनगुण्याची लक्षणे
सोबत डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, पुरळ येणे, आदी लक्षणं दिसू शकतात. पण, तापासोबतचे मुख्य लक्षण म्हणजे सांधेदुखी. सांधेदुखी जोरदार असते. हातापायांचे छोटे आणि मोठे सगळेच सांधे दुखू शकतात.
काविळची लक्षणे
विषाणूजन्य आजारामुळे यकृतावर परिणाम होऊन कावीळ होते. यामध्ये अ व ई प्रकारांमधील विषाणू दूषित अन्नाद्वारे, तर ब आणि क हे विषाणू दूषित रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध याद्वारे संक्रमित होतात. अ आणि ई ही लक्षणे सारखीच असतात. म्हणजे अशक्तपणा, भूक कमी होणे, झोप लागणे, डोळे व लघवी पिवळी होणे.
लहान मुलांमध्येही आजार
सध्या सुरू असलेल्या साथीच्या आजारात लहान मुले बाधित होण्याचे प्रमाणदेखील अधिक आहे. शाळा सुरू नसल्या तरी खासगी क्लासेस सुरू आहेत. अशा ठिकाणी मुलं एकत्रित आली तर सोबतच्या मुलांनादेखील त्या साथीच्या आजारांची लागण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आजारी असलेल्या बालकांना सार्वजनिक ठिकाणी किंवा क्लासला जाऊ देऊ नये असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
रोज किमान आठ रुग्ण
शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी व उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये किमान आठ रुग्ण मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुण्या किंवा कावीळ आढळून येत आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वेगळीच आहे.
पालिकेेने फवारणी करावी
सध्या शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे पालिकेेेने सर्व भागात फवारणी व धुरळणी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांनी मागणी करूनही अद्यापही फवारणी सुरू झालेली नाही. सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे फवारणी करून उपयोग होणार नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत फवारणी केली जाणार असल्याचे पालिका सूत्रांनी स्पष्ट केले.