ग्रामपंचायतीवर सत्तेसाठी ४२ लाखांची बोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 12:45 PM2020-12-24T12:45:53+5:302020-12-24T12:45:59+5:30

मनोज शेलार लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  वाघेश्वरी माता देवीवर श्रद्धा आणि एकदातरी सरपंचपद घरात यावे यासाठी गावातील मंदीराला ...

Bid of Rs 42 lakh for power on Gram Panchayat | ग्रामपंचायतीवर सत्तेसाठी ४२ लाखांची बोली

ग्रामपंचायतीवर सत्तेसाठी ४२ लाखांची बोली

googlenewsNext

मनोज शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  वाघेश्वरी माता देवीवर श्रद्धा आणि एकदातरी सरपंचपद घरात यावे यासाठी गावातील मंदीराला तब्बल ४२ लाख रुपयांची देणगी देऊन पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत सांभाळण्याची तयारी खोंडामळी, ता.नंदुरबार येथील प्रदीप वना पाटील यांनी दर्शविली. जिल्ह्यात खोंडामळी येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील हा लिलाव सद्या चर्चेचा विषय ठरला आहे. 
नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी हे गाव तालुक्यातील काही प्रमुख गावांपैकी एक. साधारणत:  पाच हजार लोकसंख्येच्या या गावात ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आहे. चार प्रभाग आणि १३ सदस्य असलेल्या या गावात यंदा निवडणूक बिनविरोध करावी असे काहींचे म्हणने पडले. त्यासाठी गावातील वाघेश्वरी माता मंदीर उभारणीला जो जास्त देणगी देईल त्याच्याकडे ग्रामपंचायत सुपूर्द करावी असे ठरविण्यात आले. यासाठी अनेक भक्त पुढे सरसावले. सर्व पक्षातील इच्छूकांनी त्यासाठी बोली लावली. २५ लाख, ३८ लाखापर्यंत बोली गेली. परंतु देवीचा नि:सीम भक्त आणि ग्रामपंचायत एकदा तरी आपल्या ताब्यात आणि पद आपल्या घरात यावे यासाठी प्रदीप वना पाटील यांनी इच्छा व्यक्त केली. राष्ट्रवादी कॅांग्रेसचे असलेले पाटील यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॅा.अभिजीत मोरे यांनीही प्रोत्साहन दिले. आणि ४२ लाखांवर त्यांनी बोली लावून ती अंतिम केली. या पैशातून मंदीराची उभारणी केली जाणार आहे. 
याशिवाय पाटील हे ठरवतील तेच सदस्य बिनविरोध घेतले जाणार आहे. त्यांना चार अपत्य असल्याने ते स्वत: किंवा त्यांच्या पत्नी सदस्य किंवा सरपंचपदासाठी पात्र ठरू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या मुलीला सरपंचपदावर विराजमान करावे लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या लिलाव प्रक्रियेची चर्चा जिल्हाभर आहे. गावातील काही घटकांनी याला आक्षेप घेतला. परंतु गाव विकासासाठी व गावाच्या एकीसाठी त्यांचाही विरोध मावळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणखी काय घडामोडी घडतात याकडे आता लक्ष लागून आहे. 

प्रदीप पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. त्यांची देवीवर श्रद्धा आणि पंचायत आपल्याकडे यावे अशी अपेक्षा होती. तसे त्यांनी आपल्याकडे बोलून दाखविले. त्यांना लागलीच होकार दिला. त्या माध्यमातून त्यांनी ही बोली लावली. गाव विकासासाठी सर्वजण एकत्र आल्याने आनंद आहे. इतर गावांनीही हा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा आहे.
-डॅा.अभिजीत मोरे,जिल्हाध्यक्ष, 
राष्ट्रवादी कॅांग्रेस,नंदुरबार.

Web Title: Bid of Rs 42 lakh for power on Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.