लहान भावाने केला मोठया भावाचा दगडान ठेचून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 11:40 AM2019-12-09T11:40:04+5:302019-12-09T11:40:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सततच्या आजाराला कंटाळलेल्या मोठ्या भावाने स्वत:च आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्याला अपयश आल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सततच्या आजाराला कंटाळलेल्या मोठ्या भावाने स्वत:च आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्याला अपयश आल्याने त्याने लहान भावाला दगड डोक्यात घालण्याचे सांगितले. लहान भावाने त्याचे ऐकुण त्याच्या डोक्यात तीन वेळा दगड घालून ठार केले व स्वत:च पोलिसात जावून याची माहिती दिली. नंदुरबारातील जिल्हा रुग्णालयासमोर सकाळी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
प्रकाश भटू पाटील (३५) रा.महालक्ष्मीनगर, हमालवाडा, नंदुरबार असे मयताचे नाव आहे. तर राहुल भटू पाटील असे संशयीत आरोपी अर्थात लहान भावाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश भटू पाटील हे नेहमीच आजारी राहत होते. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. सततच्या आजाराला कंटाळून प्रकाश पाटील यांनी रविवार, ८ रोजी सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही बाब त्यांचा लहान भाऊ राहुल पाटील याला कळाली. तो जिल्हा रुग्णालयाकडे गेला असता रुग्णालयाच्या अलीकडे पेट्रोल पंपाजवळ प्रकाश पाटील हे त्यांना दिसले. ते त्याच्या मागे पेट्रोलपंपा मागील शेतात गेले. तेथे प्रकाश पाटील यांनी स्वत: मरणाचा प्रयत्न केला. परंतु त्यात ते अयशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी भाऊ राहुल यास ठार मारून मुक्ती दे म्हणून सांगितले. त्यांचे एकुण राहुल याने तेथे पडलेला मोठा दगड घेवून प्रकाश यांच्या डोक्यात घातला.
तीन वेळा दगड डोक्यात घातल्यानंतर राहुल हे तेथून तडक नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला. तेथे पोलिसांना हकीकत सांगितल्यानंतर लागलीच पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय अधिकारी रमेश पवार, पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर, सहायक निरिक्षक एस.आर.दिवटे, थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतले. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला.
याबाबत स्वत: राहुल पाटील यानेच फिर्याद दिल्याने त्याच्याच विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक निरिक्षक दिवटे करीत आहे. संशयीत राहुल यास अडक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटील बंधुंमध्ये फारसा कौटूंबिक वाद नव्हता. परंतु आजारपणामुळे कुटूंब त्रस्त झाले होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
स्वत: मारेकरीच पोलीस ठाण्यात येवून खुनाची माहिती देत असल्याने ड्युटीवरील पोलीस देखील अवाक झाले. लागलीच वरिष्ठांना आणि नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली.
४मयत प्रकाश पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार असल्याचे सांगण्यात आले.