सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्याच्या पायवाटेवर धावणार आता बाईक ॲब्यूलन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 01:28 PM2021-01-08T13:28:23+5:302021-01-08T13:28:29+5:30
मनोज शेलार लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात आता बाईक अब्युलन्स धावणार असून गाव, पाड्यातील रुग्णांसाठी ते सोयीचे ...
मनोज शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात आता बाईक अब्युलन्स धावणार असून गाव, पाड्यातील रुग्णांसाठी ते सोयीचे ठरणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून किमान २०० सीसीपेक्षा अधीक क्षमतेच्या दुचाकींचा त्यासाठी वापर करण्यात येणार आहे. तरंगता दवाखाना, फायबर शिटपासून बांधकाम केलेले आरोग्य उपकेंद्र व त्यानंतर आता बाईक ॲब्यूलन्सचा प्रयोग राबिवला जात आहे.
सातपुड्यातील आरोग्याची समस्या मोठी आहे. नियमित आरोग्य केंद्र सुरू न राहणे, तेथे डॅाक्टर न राहणे अशा कारणांमुळे व वेळेवर उपचार न मिळू शकल्याने अनेकांना जीवावर बेतली आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
पावसाळ्यात सातपुड्यातील अनेक गाव, पाड्यांचा संपर्क तुटतो. त्यामुळे रुग्णांना जवळच्या आरोग्य केंद्रात नेण्यासाठी झोळी करून अर्थात ‘बांबू लेन्स’द्वारे न्यावे लागते. पावसाळ्याव्यतिरक्त इतरही वेळी रस्ते नसल्याने हा उपाय करावा लागतो. वेळेवर रुग्ण पोहचला तर ठिक, अन्यथा त्याला जीव गमवावा लागतो.
ही समस्या सोडविण्यासाठी आता पायवाटेवरही धावू शकेल अशा ‘बाईक ॲंब्यूलन्स’ चा पर्याय पुढे करण्यात आला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यासह पूर्वोत्तर राज्यांमध्ये अशा प्रकारच्या बाईक अब्युलन्स या यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात देखील हा प्रयोग करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारूड यांनी याबाबतचा विषय पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्याकडे मांडला होता. याशिवाय जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या राज्याच्या जम्बो पथकासमोर देखील ही बाब त्यांनी मांडली होती. येथील अडचणी व दळणवळणाच्या समस्या लक्षात घेता आरोग्य विभाग आणि पालकमंत्र्यांनी देखील जिल्हाधिकारी यांचा हा प्रस्ताव तत्वत: मान्य केला आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने पुरवठादारांकडून अशा ॲब्यूलन्स पुरवठासाठी निविदा प्रक्रीया राबविली आहे. ही सर्व प्रक्रिया साधारणत: महिनाभरात पुर्ण होऊन मार्च महिन्यात सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात बाईक ॲब्यूलन्स धावण्याची शक्यता आहे.
अशी असेल बाईक ॲब्युलन्स...
साधारणत: २०० पेक्षा अधीक सीसी क्षमता असलेल्या दुचाकीला ॲब्यूलन्स बनविली जाणार आहे. त्यात एक चालक, एक रुग्णाचा सोबती यांना दुचाकीवर बसण्याची तर रुग्णाला बसण्यासाठी अथवा झोपण्यासाठी ट्रॅाली राहणार आहे. ती बंदीस्त देखील करता येणार आहे. दुचाकीचे दोन व ट्रॅालीचे एक अशी तीन चाकी ॲब्यूलन्स राहणार आहे. ट्रॅालीला दोन हेडलाईट देखील राहणार आहेत.
काय सुविधा असतील...
बाईक ॲब्युलन्समध्ये प्रथमोपचार पेटी, ॲाक्सीजन सिलिंडर, रेनकोट व हवा भरण्याचा पंप राहणार आहे. दुचाकीचा मायलेज हा किमान ३५ ते ४० कि.मी.प्रतीलिटर. २०० ते २२० सी.सी.ची दुचाकी राहणार आहे. पल्सर कंपनीला आरोग्य विभागाने प्राधान्य दिले आहे. पायलट अर्थात चालक, रुग्णासोबत एकजण व रुग्ण असे तीनजण या ॲब्यूलन्समध्ये जाऊ शहणार आहेत.
मानव अधिकार आयोगाकडे बांबू लेन्सची झाली होती तक्रार...
सातपुड्यातील बांबूलेन्स अर्थात झोळी करून रुग्णाला दवाखान्यापर्यंत नेण्याचे वृत्त ‘लोकमत’ने वेळोवेळी प्रसिद्ध केले. त्या आधारे नंदुरबारचे सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते दिग्वीजयसिंग राजपूत यांनी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने जिल्हा प्रशासनाला नोटीस बजावली होती. त्यानतर बाईक अब्युलन्सला चालना मिळाली.
आरोग्य विभागाचे राहील नियंत्रण...
बाईक ॲब्यूलन्सवर आरोग्य विभागाचे नियंत्रण राहणार आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक देता येईल किंवा कसे याबाबत निर्णय झालेला नाही. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातच त्या चालविल्या जातील. तेथे यशस्वी झाल्यास इतर ठिकाणी चालविण्याबाबत विचार केला जाईल.