विसरवाडी गावाजवळ ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, दोन ठार, एक गंभीर जखमी
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: October 16, 2023 10:47 PM2023-10-16T22:47:46+5:302023-10-16T22:48:04+5:30
सोमवारी दुपारी हा अपघात घडला.
नंदुरबार : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विसरवाडी गावाजवळ भरधाव वेगातील ट्रकने मोटारसायकलीला दिलेल्या धडकेत दोघे जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. भरधाव वेगातील ट्रक थेट तिघांच्या अंगावरून गेल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला. मयतांना ट्रक उचकावून क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. सोमवारी दुपारी हा अपघात घडला.
सुनील वसंत गावित (३८) रा.उचीमौऊली ता.नवापूर असे मयताचे नाव आहे. दुसऱ्या मयताची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्याला विसरवाडी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला बापू निळ्या मालचे रा.आमळी ता.साक्री हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर, पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याची प्रकृतीही अत्यंत चिंताजनक आहे.
विसरवाडीकडून साक्रीकडे एमएच १८ क्यू ९७११ या दुचाकीने सुनील गावित हा दोघा मित्रांसह जात असताना, सरपण नदीपुलाजवळ धुळ्याकडून नवापूरकडे जाणारा टी.एन. ५२ एल ९८२० या ट्रकने धडक दिली. धडकेत दुचाकीवरील सुनील गावित व मागे बसलेला एक असे दोघेही चाकांमध्ये येऊन चिरडले गेले. अपघातात मालट्रकने तिघांना १५ फुटांपर्यंत फरफटत नेले. यात सुनील गावित जागीच ठार झाला, तर दोघे जखमी युवक अपघातग्रस्त ट्रकखाली अडकून पडला होता. त्यांना क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला करून ट्रकच्या खालून काढण्यात आले.
गंभीर युवकाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध होत नव्हते. रुग्णवाहिकाही वेळेवर पोहोचू शकली नाही. अशा वेळेस विसरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ता व उद्योजक पिकेश अग्रवाल यांनी त्यांचे वाहन उपलब्ध करून दिले व या ट्रकच्या साह्याने जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच, विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे आणि पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील व त्यांचे कर्मचारी वृंद यांनी घटनास्थळी धाव घेऊन विसरवाडी येथील युवकांची मदत घेत, अपघातग्रस्तांना मदत केली. अपघातप्रकरणी उशिरापर्यंत विसरवाडी पोलिस ठाण्यात नोंद सुरू होती.