परिचरांची बोगस नियुक्तीचेही फुटणार बिंग : अपंग युनिट नियुक्ती प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:49 PM2018-02-21T12:49:37+5:302018-02-21T12:49:37+5:30
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अपंग एकात्मक शिक्षण योजना अर्थात अपंग युनिटअंतर्गत बोगस शिक्षक भरतीप्रमाणेच बोगस परिचर अर्थात शिपाई भरतीचे रॅकेट देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे. राज्यभरात याअंतर्गत शासनाने केवळ 32 परिचर भरण्याची यादी दिली असतांना एकटय़ा नंदुरबार जिल्हा परिषदेत 23 परिचर भरती करण्यात आले आहेत. त्यामुळे बोगस परिचर भरतीचेही बिंग फुटणार असून जिल्हा परिषदेने त्यादृष्टीने चौकशीला सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.
अपंग युनिटअंतर्गत तब्बल 71 शिक्षकांच्या नियुक्तीवर शंका घेवून त्यातील बोगस आढळलेल्या 31 जणांवर जिल्हा परिषदेने तडकातडकी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असतांना व त्यात शासन, प्रशासनातील अधिकारी, कर्मचा:यांची साखळीसह बाहेरील रॅकेट समोर येत असतांना आता परिचर भरतीचेही बिंग फुटत आहे. यामुळे 23 परिचरांच्या नोकरीवर पुन्हा गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय आहे प्रकरण..
केंद्र शासनाने 2008 साली अपंग एकात्मक शिक्षण योजना लागू केली होती. त्याअंतर्गत माध्यमिक स्तरावर एका युनिटला एक शिक्षक व अपंग विद्याथ्र्याची संख्या जास्त असल्यास एक परिचर भरती करण्यात आले होते. अशा प्रकारे राज्यभरात शेकडो परिचर भरण्यात आले होते. परंतु जेंव्हा केंद्र शासनाने अपंग युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा नियमात बसणा:या केवळ 32 परिचरांनाच राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये सामावून घेण्याचे शासनाने आदेश दिले होते.
2011 साली हे आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्याअंतर्गत संबधीत 32 परिचरांना ठिकठिकाणच्या जिल्हा परिषदांमध्ये सामावून घेतले गेले आहे.
बोगस नियुक्ती आदेश
परिचरांना सामावून घेण्याच्या शासनाच्या आदेशाची मोडतोड करून शिक्षक भरतीतीलच रॅकेटने परिचर भरतीत देखील प्रशासनाला फसवले. प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचा:यांनी देखील त्यांना साथ दिली. परिणामी एकटय़ा नंदुरबार जिल्ह्यातच 23 परिचरांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. हे आदेश खरे की खोटे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. राज्यभरात जर केवळ 32 जणांना सामावून घ्यावयाचे होते तर एकटय़ा नंदुरबार जिल्ह्यात 23 जणांना कसे सामावून घेतले गेले. मुळ यादीत या 23 जणांची नावे आहेत किंवा कसे आदी प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.
असे फुटले बिंग
अपंग युनिट अंतर्गत बोगस शिक्षक भरतीची शंका मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांना आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. याचअंतर्गत परिचरांचे देखील मोठय़ा संख्येने प्रस्ताव येत असल्याचे व नियुक्ती आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त होत असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे बिनवडे यांनी त्यादृष्टीनेही तपासाला सुरुवात केली.
मुळ यादी किती जणांची व त्यात नावे कुणाची होती याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या भरतीतही गोलमाल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि बिंग फुटले.
गुन्हे दाखल होणार
परिचर भरतीत देखील बोगस नियक्ती आढळून आल्यास संबधीत कर्मचा:यांची सेवा समाप्तीसह त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल होणार आहेत. याशिवाय नियुक्ती प्रक्रियेतील अधिकारी कर्मचारी देखील त्यात गोवले जाणार असल्याच्या शक्यतेमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.