अक्कलकुव्यात दीड लाखाचे बायोडिझेल जप्त, एकाविरुद्ध गुन्हा
By मनोज शेलार | Published: January 19, 2024 06:35 PM2024-01-19T18:35:56+5:302024-01-19T18:36:14+5:30
अक्कलकुवा येथे पोलिसांनी एक लाख ६३ हजार रुपयांचे दोन हजार ९० लिटर बायोडिझेल जप्त केले.
मनोज शेलार/नंदुरबार
नंदुरबार : अक्कलकुवा येथे पोलिसांनी एक लाख ६३ हजार रुपयांचे दोन हजार ९० लिटर बायोडिझेल जप्त केले. सात लाखांच्या पिकअप वाहनासह एकूण आठ लाख ६३ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, अक्कलकुवा नजीक सोरापाडा ते झापाआमली दरम्यान एका वाहनातून बायोडिझेल विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अक्कलकुवा पोलिसांनी शोध घेतला असता झापाआमली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन (क्रमांक एमएच ३९ एडी १९२४) उभे असल्याचे दिसून आले. वाहनाची तपासणी केली असता त्यात प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये बायोडिझेल असल्याचे दिसून आले.
एकूण दोन हजार ९० लिटर बायोडिझेल आढळून आले. त्याची किंमत एक लाख ६३ हजार २० रुपये इतकी आहे. शिवाय पोलिसांनी सात लाख रुपये किमतीचे पिकअप वाहनदेखील जप्त केले. याबाबत हवालदार अजय अरुण पवार यांनी फिर्याद दिल्याने ईराराम ऊर्फ ईश्वर केसाराम चौधरी (३४) रा. खापर, ता. अक्कलकुवा याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमन्वये अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार सागर नांद्रे करीत आहेत.