धार्मिक विस्तवावर ‘विवर’ने घातली फुंकर : जिभाऊ करंडक राज्य एकांकिका स्पर्धा
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: January 22, 2018 12:19 PM2018-01-22T12:19:00+5:302018-01-22T12:19:24+5:30
संतोष सूर्यवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : हिंदू-मुस्लिमांमधील धार्मिक असंतोषासारख्या संवेदनशील विषयाला ‘विवर’ या नाटिकेव्दारे हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला आह़े नाटिकेतील दोन्ही पात्रांनी दिग्दर्शकाच्या अपेक्षांची पूर्तता केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही़
इरफान मुजावरव्दारे लिखीत व प्रेरणा चंद्रात्रे दिग्दर्शीत ‘विवर’ या नाटिकेत आकांक्षा चंद्रात्रे व वृषाली रकिबे या दोन्ही कलाकारांनी अनुक्रमे विभा व हिनाची भुमिका पार पाडली आह़े कार्लमाक्सने सांगितल्यानुसार ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ या सूत्रावर आधारीत ही नाटीका रंगवण्यात आली आह़े मनुष्याच्या दैनंदिन जीवनावर तसेच त्यांच्या मनावर धर्माची किती पकड आहे, याचे उत्तम सादरीकरण या नाटिकेच्या माध्यमातून करण्यात आले आह़े हिंदू असलेली विभा ही एक प्रचंड धार्मिक वृत्तीची महिला परंतु जसा-जसा मुस्लिम असलेल्या हिनाशी तिचा संवाद वाढत जातो, तशी-तशी त्यांच्यातील ‘केमेस्टी’ अधिक घट्ट होत जाताना नाटकातून दिसून येत आह़े बाहेरील दंगेखोर वातावरणाला घाबरुन हिना ही विभाच्या घरी आश्रयाला येत़े सुरुवातीला हिनाच्या स्पर्शानेही स्वताला अस्पृश्य समजणारी विभा कालांतराने, वाढत्या संवादाने कशा प्रकारे हिनाला आपल्या जवळची समजू लागते याचा प्रवास यात सादर करण्यात आला आह़े परंतु एकीकडे धर्म तर दुसरीकडे मानुसकीच्या मध्यात अडकलेल्या विभाच्या मनाची घालमेल ही प्रेक्षकांना चांगलीच भावली आह़े नाटीकेच्या एका प्रसंगात दाखवल्या प्रमाणे, विभाच्या घरातील तेवत असलेला दिवा हा तिच्या मुलाच्या सुखरुपतेचे प्रतिक असतो़़ परंतु मासिक पाळीमुळे तो दिवा तेवत ठेवण्यात विभाला मोठी अडचण निर्माण होत असत़े शिवाय एका मुस्लिम धर्माच्या हिनाकडून दिव्यात तेल टाकणेही तिला मान्य नसत़े त्यामुळे दिव्यात तेल टाकण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या शोधात विभा घराबाहेर पडत़े परंतु तोवर दिव्याचे तेल संपत जाते हे पाहून कसलाही विचार न करता हिना त्या दिव्यात तेल टाकत़े तेल टाकण्यासाठी कुणीही न भेटल्याने हताश होऊन विभा घरी परतते परंतु तोवर संपूर्ण चित्र बदलले असत़े
देवघरासमोर नमाज अदा करीत असलेल्या हिनाकडे जिव्हाळ्याने विभाकडून पाहिले जात असताना या नाटिकेवर पडदा पडतो़ या नाटिकेच्या माध्यमातून धार्मिक हिंसाचार भडकवणा:या ‘काही’ लोकांना चपराक देण्याचा दिग्दर्शकाचा हेतू येथे सफल होताना दिसतो़