आक्राळे शिवारात अवैध संबधातून झाला महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:05 PM2018-08-04T12:05:29+5:302018-08-04T12:05:37+5:30
24 तासात उलगडा : नंदुरबारातील महिलेचा आक्राळे शिवारात खुनाच्या घटनेमुळे खळबळ
नंदुरबार : नंदुरबारातील महिलेचा आक्राळे शिवारात झालेल्या खुनाचा उलगडा अवघ्या 24 तासात करण्यात एलसीबीला यश आले आहे. अनैतिक संबधातून महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून संशयीतास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मोगाबाई संतोष ठाकरे (30) रा.भोणेफाटा झोपडपट्टी, नंदुरबार असे मयत महिलेचे नाव आहे. तर दीपक सुदाम भिल, रा.जीटीपी भिलाटी, नंदुरबार असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, मोगाबाई यांचा विवाह शहरातीलच चिंचपाडा भिलाटीत राहणा:या संतोष ठाकरे यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुलं व एक मुलगी देखील आहे. परंतु काही महिन्यांपासून मोगाबाई या पतीकडे न राहता भोणेफाटा झोपडपट्टीतील आपल्या आई-वडिलांकडे राहत होत्या. धुणी,भांडी करण्याचे काम त्या करीत होत्या.
दोन दिवसांपासून बेपत्ता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोगाबाई या बुधवारी सायंकाळपासून बेपत्ता झाल्या होत्या. बुधवारी सायंकाळी जेवन केल्यानंतर त्या बाजुला जावून येते असे सांगून गेल्या असता परत आल्याच नाहीत. त्यांचा ठिकठिकाणी शोध घेण्यात आला होता. परंतु त्या मिळून आल्या नव्हत्या, अखेर गुरुवारी रात्री त्यांचा मृतदेहच आढळून आला. शुक्रवारी सकाळी ओळख पटल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
नाल्याच्या चारीत मृतदेह
मोगाबाई यांचा मृतदेह भाईदास पाटील यांच्या शेताजवळील नाल्याच्या चारीत गुरुवारी रात्री आढळून आला. अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती आक्राळे येथे मिळाल्यानंतर मृतदेह पहाण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. महिलेची ओळख पटत नसल्यामुळे पोलीस पाटील रामदास कृष्णा रजाळे यांनी तातडीने तालुका पोलिसांना याबाबत माहिती दिली.
तिक्ष्ण हत्याराने वार
महिलेवर अतिशय तिक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून आले. गळ्यावर, छातीच्या डाव्या बाजुला हे वार करण्यात आले आहेत. वार खोलवर असल्याने व अतिरक्तश्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला. बुधवारी रात्री ते गुरुवारी दुपारी या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
पोलीस अधिकारी रवाना
आक्राळेचे पोलीस पाटील रामदास रजाळे यांनी पोलिसांना कळविताच घटनेचे गांभिर्य ओळखून रात्रीच पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, तालुका पोलीस ठाण्याचे निरिक्षक संजय महाजन हे घटनास्थळी दाखल झाले. महिलेचा मृतदेह आणि परिसराची पहाणी करून त्यांनी तपासाची दिशा निश्चित केली.
एलसीबीची कामगिरी
या घटनेचा समांतर तपास एलसीबीने सुरू केला होता. पोलीस निरिक्षक किशोर नवले यांनी पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपअधीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. गुप्त यंत्रणा आणि शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करून त्यांनी शुक्रवारी सायंकाळी संशयीत आरोपी दीपक सुदाम भिल यास अटक केली. त्याला पोलीसी हिसका दाखवताच त्यानेच अनैतिक संबधातून मोगाबाई हिचा आक्राळे शिवारात घेवून जावून खून केल्याचे सांगितले. त्यामुळे अवघ्या 24 तासात या घटनेतील आरोपी निष्पन्न होऊन घटनेचा उलगडा झाला.
ही कारवाई पोलीस निरिक्षक किशोर नवले, सहायक निरिक्षक गणेश न्हायदे, हवालदार विकास पाटील, युवा सोनवणे, रवींद्र पाडवी, विनोद जाधव, प्रमोद सोनवणे, विकास अजगे, गोपाल चौधरी, तुषार पाटील, महेंद्र सोनवणे, पुष्पलता जाधव, राहुल भामरे, मोहन ढमढेरे, किरण मोरे, सतिष घुले यांनी केली. खुनाचा गुन्ह्याचा लागलीच तपास लावण्यात यश आल्याने पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतूक केले.