गुजरातमधून झाली बोगस बियाण्यांची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:09 PM2018-05-12T13:09:27+5:302018-05-12T13:09:27+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 12 : येथील एका घरगुती कृषी केंद्रावर गुरूवारी संध्याकाळी गुणनियंत्रण विभागामार्फत धाड टाकून एक लाख 72 हजार 50 रुपये किंमतीचे बोगस आर.आर. बीटी कापूस बियाणे जप्त करण्यात आले. याप्रकरणी म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बियाणे गुजरातमधून आली होती.
म्हसावद भागात बोगस बियाणे विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानुसार जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरूण श्रीराम तायडे (रासायनिक खते / बियाणे) यांचेसह पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने चिखली फाटय़ाजवळ एका घरगुती केंद्रावर धाड टाकण्यात आली तेव्हा दुकानदार पोपट पाशा मालवीय हे गुजरातला कामानिमित्त गेले होते. महिला पोलीस कर्मचारी शीतल धनगर यांनी मालवीय यांची प}ी रेखाबाई मालवीय यांना छापा टाकण्यात येत असल्याचे सांगून कारवाई सुरू करण्यात आली.
यात वेगवेगळ्या कंपनीची बोगस कापूस बियाण्यांची पाकीटे जप्त करण्यात आली. (कंसात पाकीटची संख्या दिली आहे.) महाधन 155 (31), महाधन 255 (25), महाधन 501 (आठ), महाधन लिलक (15), गोपाल 155 (36), गोपाल 444 (30), हविशा नऊ (14), गोपी 155 (23), गोपाल बीजीट (एक), महाधन बिग बॉल (दोन) अशी 185 पाकीटे जप्त करण्यात आली. प्रत्येक पाकीटाची किंमत 930 रुपयांची असून, एकूण एक लाख 72 हजार 50 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. प्रत्येकी पाकीटातून तीन नमुने काढून एच.टी.बी.टी. तपासणीसाठी सीलबंद करण्यात आले आहे. हे बोगस बियाणे गुजरात राज्यात तणनाशक बीटी कापूस बियाणे म्हणून विक्री करण्यात येत असते. गेल्या वर्षी खेडदिगर येथे बोगस बियाणे विक्री करून शेतक:यांची फसवणूक करण्यात आली होती.
जिल्हा कृषी अधिकारी एम.एस. पन्हाळे, शहादा उपविभागीय कृषी अधिकारी मोहन सोमा रामोळे, गुणनियंत्रण निरीक्षक अरूण श्रीराम तायडे, शहादा तालुका कृषी अधिकारी प्रविण विठ्ठल भोर, मंडळ कृषी अधिकारी वसंत हरी मराठे, कृषी सहाय्यक कृष्णा इंदासराव निकुंभे यांच्यासह म्हसावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश चौधरी, राजेंद्र काटके, अनिल पावरा, शीतल धनगर यांनी धाड टाकली.
बोगस बियाणे विक्रीबाबत जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरूण तायडे यांनी म्हसावद पोलिसात फिर्याद दिल्यानुसार पोपट पाशा मालवीय यांच्या विरोधात म्हसावद पोलिसात जीवनावश्यक वस्तु सेवा कायदा 1955 चे कलम तीन, नऊ चे उल्लंघन, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या खंड प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून, म्हसावद पोलीस तपास करीत आहेत.