शिक्षक घोटाळ्यात 12 शाळांनी दाखविले बोगस अपंग युनिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:08 PM2018-02-23T13:08:23+5:302018-02-23T13:08:23+5:30
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 31 व संशयीत 40 अशा 71 जणांना ज्या शाळा व संस्थांनी आपल्या संस्थेत नेमणुकीस दाखविले होते त्या संस्था व शाळांचीही चौकशी होणार आहे. अशा शाळा, संस्थाचालकांनी अशा उमेदवारांना आपल्याकडे नोकरीस असल्याचे दाखविण्यासाठी कसा व कोणता आर्थिक व्यवहार केला याची चौकशी होऊन त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यासाठी आता पोलिसांनीच व्यापक तपास मोहिम सुरू करणे आवश्यक आहे.
अपंग युनिटअंतर्गत शिक्षक भरतीचा घोटाळ्याची व्याप्ती मारुतीच्या शेपटीप्रमाणे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. केंद्र शासनाच्या या अपंग एकात्मिक योजनेअंतर्गत 2008 मध्ये अपंग युनिट माध्यमिक शाळांमध्ये चालविण्यात आले होते. ते युनिट 2010-11 मध्ये बंद करण्यात आले. त्यातील साडेपाचशेपेक्षा अधीक शिक्षकांना राज्यभरात सामावून घेण्यात आलेही. परंतु त्यानंतरही समायोजन करण्यासाठी बोगस शिक्षक संस्था, शाळांमध्ये दाखविण्यात आले. त्यातील एक मोठी संस्था धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील आहे. या संस्थेचे शिंदखेडा, साक्री, शिरपूर तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यात देखील काही शाखा आहेत. याशिवाय नंदुरबार जिल्ह्यातीलच एका संस्था चालकाचे नाव देखील पुढे येत आहे. या संस्था चालकाच्याही जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाखा आहेत. संबधीताने एका राजकीय पक्षाचे मोठे पद देखील मिळविले आहे. या दोन संस्था चालकांनीच हे रॅकेट तयार केले होते. त्यांनीच आपल्या संस्थांमधील विविध शाखांमध्ये 71 जणांना अपंग युनिटमधील शिक्षक असल्याचे दाखविले आहे. अपंग विद्यार्थी नसतांना तेथे युनिट कसे दाखविण्यात आले हा प्रश्न आहे.
संबधीत शाळांची चौकशी..
71 जणांच्या कागदपत्रांमध्ये ज्या शाळांमध्ये ते यापूर्वी अपंग युनिटअंतर्गत असल्याचे दाखविण्यात आले आहे त्या शाळांची चौकशी होण्याची शक्यता आहे. अशा शाळांमधील तत्कालीन मुख्याध्यापकांनी युनिट कसे दाखविले, कुठल्या आधारावर ते निर्माण करण्यात आले. विद्यार्थी असतील तर कुठले होते. त्यांची यादी त्या शाळांमध्ये आहे का? असे एक ना अनेक प्रश्न या चौकशीत उपस्थित होणार आहे.
संस्थाचालक परागंदा
या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार दोन संस्थाचालक व त्यांना मदत करणारे तीन असे पाचजण सध्या परागंदा आहे. पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या कारवाईपासून बचावासाठी ते वरिष्ठ पातळीवर हरत:हेने प्रय} करीत आहेत. ज्यांनी पैसे दिलेले आहेत ते युवक आणि त्यांचा परिवार देखील या संस्थाचालकांच्या मागावर आहेत.
तपासाची व्यापकता वाढवावी
या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला आहे. परंतु पोलिसांकडून अगदीच थंड तपास सुरू आहे. प्रकरणाची व्याप्ती पहाता पथके स्थापन करून मुळ सूत्रधारांर्पयत पोहचण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.