बोराळेत गुंजला ‘वंदे मातरम्’चा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 11:54 AM2019-02-06T11:54:26+5:302019-02-06T11:54:32+5:30

शहीद स्मारकाचे लोकार्पण : शहीद मिलिंद खैरनार यांचे कुटुंब गहिवरले

Boraleet Gunjala 'Vande Mataram' The Surround | बोराळेत गुंजला ‘वंदे मातरम्’चा सूर

बोराळेत गुंजला ‘वंदे मातरम्’चा सूर

Next

नंदुरबार : वंदे मातरम्, शहीद जवान अमर रहे, शहीद मिलिंद खैरनार अमर रहे.. या घोषणांनी मंगळवारी तापीकाठ दणाणला होता. निमित्त होते बोराळे, ता.नंदुरबार येथे शहीद मिलिंद खैरनार यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या शहीद स्मारक लोकार्पणाचे. अतिशय भावनिक आणि देशप्रेमाने भारावलेल्या या कार्यक्रमाने खैरनार कुटुंब गहिवरले होते.
बोराळे, ता.नंदुरबार येथील भारतीय सैन्यातील सशस्त्र अधिकारी मिलिंद किशोर खैरनार हे 11 ऑक्टोबर 2017 रोजी दहशतवाद्यांशी दोन हात करताना काश्मीरच्या सीमेवर शहीद झाले होते. परिसरातील व जिल्ह्यातील नागरिकांना शहीद मिलिंद खैरनार यांच्या बलिदानाची प्रेरणा लोकांसमोर कायम राहावी या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी त्याचवेळी स्मारक बनविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून या स्मारकाची निर्मिती केली. त्याचे लोकार्पण मंगळवारी सकाळी झाले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जि.प. सदस्य अभिजित पाटील, प्रीती अभिजित पाटील, शहीद मिलिंद खैरनार यांच्या पत्नी हर्षदा खैरनार, वडील किशोर खैरनार, आई सुनंदा खैरनार व परिवारातील सदस्य उपस्थित होते.
स्मारकाचे लोकार्पण करताना त्याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच हर्षदा खैरनार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. बोराळेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तिरंग्याला सलामी देत वंदे मातरम्च्या घोषणा दिल्या. सारा आसमंत या घोषणांनी दणाणून सोडला होता. अतिशय देशप्रेमाने भारावलेल्या या सोहळ्याने मिलिंद खैरनार यांचे कुटुंबीय गहिवरले होते.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी सांगितले की, हे स्मारक गावालाच नव्हे तर जिल्हा आणि राज्याला देशसेवेची प्रेरणा देणारे आहे. त्याचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे. ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी त्याची जबाबदारी घ्यावी. शासन खैरनार कुटुंबाच्या पाठीशी आहे. शासन-प्रशासन जे शक्य ते करणारच आहे पण लोकांनी एकत्र येऊन हे स्मारक विकसीत कसे होईल त्याकडे लक्ष घालणे आवश्यक आहे. अभिजित पाटील यांनी पुढाकार घेऊन जे काम केले ते खरोखरच कौतुकास्पद असून सर्वासाठीच हे स्मारक प्रेरणादायी ठरणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. अभिजित पाटील यांनी प्रास्ताविकात अल्प काळात हे स्मारक उभारण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करीत जिल्हा प्रशासनाच्या व खास करून जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांच्या भक्कम पाठींब्यामुळेच या स्मारकाची निर्मिती झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमास अ.भा. शिंपी समाजाचे अध्यक्ष सुनील निकुंभ, कार्याध्यक्ष रवींद्र बागूल, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल भामरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष रघुनाथ पाटील, प्राचार्य आय.डी. पाटील, बोराळेचे सरपंच पूनमचंद पाटील, उपसरपंच यशवंत भिल, पोलीस पाटील अजय पाटील, अमोल पाटील, भरतसिंग राजपूत, नारायणसिंग राजपूत, शिंपी समाजाचे पदाधिकारी गोपाळराव शिंपी, नितीन बाविस्कर, संजय खैरनार, पुरुषोत्तम शिंपी, सुभाष सावळे, गोकूळ शिंपी, कमलाकर कापडणे, प्रवीण चित्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.  सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी तर आभार योगेश राजपूत यांनी मानले.
 

Web Title: Boraleet Gunjala 'Vande Mataram' The Surround

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.