नवापूर शहरात धाडसी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 12:37 PM2021-01-01T12:37:50+5:302021-01-01T12:37:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील मंगलदास पार्क परिसरात दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. चोरीदरम्यान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील मंगलदास पार्क परिसरात दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. चोरीदरम्यान एका घरातून निराशा झाल्यानंतर चोरट्यांनी समोरच्या घरात प्रवेश केला होता. याठिकाणी वृद्ध दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवत सुमोर १ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला.
मंगलदास पार्क परिसरात प्रा. जी. एस. पाटील व माजी नगरसेविका तथा प्रा. विजया जडे या दोघा सेवानिवृत्त प्राध्यापकांची घरे समोरासमोर आहेत. प्रा. विजया जडे या गेल्या एक वर्षापासून हैदराबाद येथे वास्तव्यास असल्याने त्यांचे घर बंद आहे. बुधवारी पहाटे चोरट्यांनी प्रथम त्यांचे घर फोडून आत प्रवेश केला. परंतू याठिकाणी त्यांना कोणतीही किमती वस्तू मिळालेले नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान चोरट्यांनी आपला मोर्चा प्रा. जी. एस. पाटील यांच्या घराकडे वळवला. खिडकीची लोखंडी ग्रील तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील तळमजल्यावर वयोवृद्ध जोडपे झोपलेले होते. यात ८५ वर्षीय वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी व कपाटातील मंगळसूत्र असा एक लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. चोरट्यांनी घरात प्रवेश करताना झाडे कापण्यासाठी घराच्या पुढच्या बाजूस ठेवलेला कोयता उचलून घरात खालच्या रूममध्ये असलेल्या वृद्ध दाम्पत्यांना धमकावत दागिने घेऊन गेल्याचे सांगण्यात आले असून, चोरट्यांनी कोणासही इजा पोहोचवली नसल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. वेळीच गस्त करत असलेल्या पोलीस वाहनाचा सायरन ऐकल्याने चोरट्याने पळ काढला होता. पोलीस गस्त असतांना ही चोरट्यांनी केलेली घरफोडी नवापूर पोलिसांना जणू काही आव्हान दिले असल्याचे बोलले जात आहे. चोरीदरम्यान मराठी बोलणाऱ्या चोरट्यांचा हातात असलेल्या कोयता बघून वृद्ध दाम्पत्यांनी चोरट्यांना प्रतिकार न केल्याने जीवितहानी टळली आहे. प्रत्यक्ष दर्शीने धड-धाकड तीन चोरट्यांपैकी दोन रुमाल बांधून होते, तर एक मराठी भाषा बोलत असल्याचे सांगितले.
घटनास्थळी भेट देत पोलिसांनी परिसरातील घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासत माहिती घेतली होती. याबाबत प्रा. जी. एस. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनात सहायक उपनिरीक्षक धीरज महाजन हे घटनेचा तपास करत आहेत.