नंदुरबारमधून प्रचार शुभारंभाला गांधी घराण्याकडून प्रथमच ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:14 AM2019-03-20T11:14:12+5:302019-03-20T11:14:40+5:30
राहुल गांधींनीही धुळ्याला सभा घेतल्याने हिरमोड
रमाकांत पाटील ।
नंदुरबार : गांधी घराणे आणि नंदुरबारातील आदिवासींचे नाते गेल्या साडेचार दशकांपासून जुळले आहे. त्यामुळे कुठल्याही निवडणुकीच्या प्रचाराचा शुुभारंभ नंदुरबारपासून करण्याची प्रथाच जणू रुढ झाली होती. यावर्षी मात्र या घराण्यातील नव्या वारसदार प्रियंका गांधी यांचा राजकारणातील प्रवेशाची सुरुवात नंदुरबारपासूनच व्हावी असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्याला मात्र या वेळी ‘ब्रेक’ मिळाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांचा या जिल्ह्यातील आदिवासींवर मोठा प्रभाव होता. त्यामुळे १९७६ नंतर इंदिरा गांधी यांनी आपल्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात नंदुरबारपासूनच करीत असत. त्यांनी दिलेला ‘गरीबी हटाव’चा नारा येथील आदिवासींना चांगलाच भावल्याने त्याचा प्रभाव आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत जाणवत होता. त्यांच्यानंतर स्व.राजीव गांधी यांच्या प्रचारसभाही चांगल्याच गाजल्या. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या राजकीय प्रवेशानंतर त्यांची पहिली सभा कुठे व्हावी याबाबत पक्षांतर्गत अनेक चर्चेनंतर नंदुरबारचे नाव निश्चित करण्यात आले. त्यावेळी झालेली नंदुरबारची त्यांची सभा विक्रमी ठरली.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. गेल्यावेळी प्रथमच या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्या पराभवाचे कारणही काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते सोनिया गांधी यांची नियोजित सभा ऐनवेळी रद्द झाल्याचा परिणाम सांगतात. सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्या सभेला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. त्यांच्या सभेला लाखोंचा जनसमुदाय जमला होता. पण त्या उपस्थित न राहू शकल्याने निवडणुकीवर परिणाम झाल्याचे काही कार्यकर्ते सांगतात.
एकूणच या मतदारसंघात गांधी घराण्याच्या सभांचा मोठा प्रभाव होत असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मानणे आहे. या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांच्या राजकीय प्रवेशानंतर त्यांची पहिली सभा ही नंदुरबारलाच व्हावी, असा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यासाठी काँग्रेसतर्फे येथील दोन्ही इच्छुक उमेदवार आमदार अॅड.के.सी. पाडवी व जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत यांनी प्रियंका गांधी यांनी पहिली सभा नंदुरबारला घ्यावी, असा आग्रह केला होता. त्याबाबत पक्षाकडे प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली. तसेच ई-मेलही पाठविले होते. मात्र प्रियंका गांधींच्या प्रचाराला सुरुवात उत्तर प्रदेशातून झाली. त्यांचा ‘नाव पे चर्चा’ हा उपक्रम सध्या सुरू आहे. तो अधिक चर्चेतही आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा काहीसा हिरमोड झाला असला तरी त्यांची सभा या निवडणूक काळात नंदुरबारला होईल, असा आशावादही व्यक्त केला जात आहे.
राहुल गांधींनीही घेतली धुळ्याला सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात सभा घेतल्याने राहुल गांधी यांनीही नंदुरबार ऐवजी धुळ्याला त्याच ठिकाणी सभा घेतली. त्यामुळे नंदुरबारपासून प्रचाराचा शुभारंभ करण्याची प्रथा प्रथमच मोडीत निघाल्याने काँग्रेसचे स्थानिक नेते, कार्यकर्त्यांचा काहीसा हिरमोड झाला.
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची राजकारणातील प्रवेशाची पहिली सभा नंदुरबारला व्हावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. ही पहिली सभा जरी नंदुरबारला होऊ शकली नसली तरी नंदुरबारची निवडणूक चौथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे निवडणूक काळात त्या निश्चित नंदुरबारला येतील व येथे सभा घेतील. -भरत गावीत, माजी अध्यक्ष, जि.प. नंदुरबार