कुटुंब निवृत्तिवेतन मिळवून देण्यासाठी दोन हजारांची लाच, एकास अटक
By मनोज शेलार | Published: January 19, 2024 05:12 PM2024-01-19T17:12:36+5:302024-01-19T17:12:49+5:30
व्यक्तीची पत्नी शासकीय आश्रमशाळेत कायमस्वरूपी स्वयंपाकी म्हणून नोकरीस होती. २९ डिसेंबर २०२३ रोजी त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंब निवृत्तिवेतन पती म्हणून मिळावे यासाठी त्यांनी प्रस्ताव सादर केला होता.
नंदुरबार : कुटुंब निवृत्तिवेतन मिळवून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या उपलेखापालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. कोषागार कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
रमेश चंद्रसिंग पवार (४५), उपलेखापाल, कोषागार कार्यालय, नंदुरबार असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजविहीर, ता.तळोदा येथील ७६ वर्षीय व्यक्तीची पत्नी शासकीय आश्रमशाळेत कायमस्वरूपी स्वयंपाकी म्हणून नोकरीस होती. २९ डिसेंबर २०२३ रोजी त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंब निवृत्तिवेतन पती म्हणून मिळावे यासाठी त्यांनी प्रस्ताव सादर केला होता. ते मंजूर करण्यासाठी रमेश पवार यांनी त्यांच्याकडून दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. बुधवारी सायंकाळी उशिरा पवार यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताच सापळा लावून बसलेल्या पथकाने त्यांना अटक केली. बुधवारी रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करून पवार यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राकेश चौधरी, निरीक्षक समाधान वाघ, माधवी वाघ, हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, नरेंद्र पाटील, सुभाष पावरा, देवराम गावित, अमोल मराठे, ज्योती पाटील, मनोज अहिरे, संदीप नावाडेकर, संदीप खंदारे, जितेंद्र महाले यांनी केली.