सारंगखेडाजवळ तापी नदीवरील पुलाला भगदाड; वाहतूक वळवली; महामार्गाचे पथक दाखल
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: September 17, 2023 05:21 PM2023-09-17T17:21:49+5:302023-09-17T17:22:03+5:30
नंदुरबार : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाला रविवारी दुपारी अचानक भगदाड पडल्याने दुर्घटना टळली. यासंदर्भात वाहन चालकाच्या ...
नंदुरबार : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाला रविवारी दुपारी अचानक भगदाड पडल्याने दुर्घटना टळली. यासंदर्भात वाहन चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रशासनाला माहिती देताच प्रशासन दक्ष झाले असून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सारंगखेडा पुलाचा टाकरखेडा गावाकडील भराव खचल्याने पुलाला धोका असल्याची स्थिती होती. यासंदर्भात ‘लोकमत’नेही वृत्त प्रसिद्ध केले होते. परंतु संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने रविवारी अखेर दुपारी चार वाजेच्या सुमारास भराव खचल्याने पुलाला मोठे भगदाड पडले. ही बाब एका ट्रक चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने इतर वाहनधारकांना ही माहिती दिली. तसेच सारंगखेडा पोलीस ठाण्यातही त्याबाबत माहिती दिल्याने पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
तसेच दोंडाईचा येथील पोलीस निरीक्षक श्रीराम पवार हेही कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत वाहतूक तात्काळ बंद केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता प्रवीण साळुंखे हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. पुलाला दोन्ही बाजूने बॅरेकेटींग करण्यात आले असून वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे दोंडाईचाहून शहादाकडे व शहाद्याहून दोंडाईचाकडे जाणारी वाहतूक प्रकाशामार्गे वळविण्यात आली आहे.