मोलगी परिसरात बीएसएनएलची सेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:27 AM2021-01-17T04:27:20+5:302021-01-17T04:27:20+5:30

कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांसमोर ऑनलाइन शिक्षण हा एकच पर्याय आहे. मात्र अतिदुर्गम ...

BSNL service disrupted in Molgi area | मोलगी परिसरात बीएसएनएलची सेवा विस्कळीत

मोलगी परिसरात बीएसएनएलची सेवा विस्कळीत

Next

कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांसमोर ऑनलाइन शिक्षण हा एकच पर्याय आहे. मात्र अतिदुर्गम भागात मोबाईल व इंटरनेट सेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मुकावे लागत आहे. मोलगी आणि धडगाव भागातील अनेक विद्यार्थी हे गुजरात, मध्य प्रदेश राज्यातून मिळणाऱ्या रेंजसाठी उंच-उंच डोंगर-टेकड्यांवर बसलेले पाहायला मिळतात. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी आपल्या मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी खोली करून राहावे लागत आहे. आताचे शैक्षणिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असून विद्यापीठाच्या परीक्षाही ऑनलाइन होणार असल्याने व जनतेची अनेक कामे ऑनलाइनशी जोडल्याने प्रचंड प्रमाणात अडचणी वाढल्या आहेत. मात्र संबंधितांकडून काहीही उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या परिसरात अनेक ठिकाणी इतर कंपन्यांचे टॉवर एक वर्षापासून उभे आहेत पण त्यांना चालू व्हायला मुहूर्त मिळत नाही. मोलगी हे गाव तालुक्याच्या दृष्टीने मोठे असल्याने याठिकाणी असलेल्या मुख्य टॉवरवर पूर्ण लोड येत आहे. त्यामुळे आपण लावलेला कॉल हा दुसऱ्याच व्यक्तीला लागतो किंवा बोलत असताना क्रॉस कॉलिंग होते. या समस्येने परिसरातील जनता हैराण झाली आहे. त्याचप्रमाणे मोलगी गावात अनेक दिवसांपासून टू जी व थ्री जी सेवा मिळत नसल्याने इतर कंपनीकडून अनेक जणांनी ऑनलाइन कामाच्या सुविधेसाठी जोडणी करून घेतली पण त्यालाही पाहिजे त्या प्रमाणात रेंज मिळत नाही. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन सेवा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: BSNL service disrupted in Molgi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.