धोकेदायक बिलगाव धबधब्यावर संरक्षण भिंत बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 12:11 PM2020-11-22T12:11:45+5:302020-11-22T12:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : धडगाव तालुक्यात उदय नदीवर असलेला बिलगाव येथील धबधबा पर्यटकांसाठी अक्षरशः जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : धडगाव तालुक्यात उदय नदीवर असलेला बिलगाव येथील धबधबा पर्यटकांसाठी अक्षरशः जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीकोणातून तेथे संरक्षण भिंत व सूचना फलक तातडीने लावावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा या प्रकरणी आंदोलन छेडण्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
तालुक्यातील बिलगाव जवळ मोठा धबधबा आहे. अतिशय निसर्गरम्य असा हा धबधबा असल्यामुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असल्याने याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. विशेषत: सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात या धबधब्याचा प्रवाह कायम असतो. म्हणून पर्यटक व निसर्ग प्रेमी मनमुराद आनंद लुटण्यासाठी याठिकाणी येत असतात. त्यातही नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील तरूण पर्यटक अधिक प्रमाणात हजेरी लावतात. साहजिकच पर्यटकांच्या प्रतिसादामुळे हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून नावारूपालादेखील येत आहे. मात्र गेल्या तीन ते चार वर्षांपासून येथील दुर्घटनेत वाढ होत असल्याने जणू हा धबधबा पर्यटकांसाठी जीवघेणा बनला आहे. कारण तेथे वनविभागाने सूचना व मार्गदर्शक फलक लावला नसल्यामुळे पर्यटकांना पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे पाय घसरून अथवा पोहणाऱ्या पर्यटकांना जीव गमावावा लागला आहे.
विशेषत: तरूण पर्यटक यात बळी गेले आहेत. गेल्या तीन वर्षात तब्बल सहा तरूण या धबधब्यात मृत्यू मुखी पडले आहेत. गेल्या आठवड्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या परगावातील कार्यकर्त्यावर पाय घसरल्यामुळे दुर्दैवी मृत्यू ओढवला होता. यापार्श्वभूमीवर या धबधब्या जवळ शासनाने अथवा वनविभागाने संरक्षक भिंती बरोबरच मार्गदर्शक सूचना फलक लावावा. जेणे करून पर्यटकांच्या मृत्यूच्या घटना तरी थांबतील, अशी मागणी गावकरीनी धडगाव महसूल प्रशासनास दिलेल्या निवेदनात केली आहे.
वास्तविक येथे पर्यटन स्थळाच्या अनुषंगाने शासनाने अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा असताना साधा सूचना फलक ही लावण्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. येथील वाढत्या अप्रिय घटना लक्षात घेवून प्रशासनाने निदान सूचना फलक व संरक्षक भिंत तातडीने उभारावी, अशी मागणी संघर्ष ग्रुप चुलवडचे राजेंद्र पवार, सचिन वळवी, रवींद्र पावरा, अपसिंग पावरा, करण पावरा, ब्रिजलाल पावरा, पंकज पावरा, सुकलाल पावरा, अजित पवारा यांनी केली आहे.
रस्ते, वीज अशा प्राथमिक सुविधांचाअभाव
धडगाव परिसरात अनेक लहान मोठे धबधबे असले तरी बिलगावचा धबधबा अतिशय मोठा आहे. त्यामुळे संपूर्ण सातपुड्यात प्रसिद्ध आहे. निश्चितच एक सुंदर, रमणीय पर्यटन स्थळ म्हणून विकसीत होवू शकते. मात्र याकडे शासनातील अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष आहे. कारण याठिकाणी रस्ते, वीज या सारख्या प्राथमिक सुविधा नाहीत. तरीही शौकीन पर्यटक व निसर्ग प्रेमी निसर्गाला न्याहळण्यासाठी याठिकाणी येत असतात. निदान अशा प्राथमिक सुविधांसाठी तरी जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.