आरोग्य केंद्राची इमारत ठरतेय निरुपयोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:41 PM2019-01-20T12:41:34+5:302019-01-20T12:41:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ओहवा येथे लाखो रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ओहवा येथे लाखो रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र इमारतीच्या निकृष्ट बांधकामामुळे गेल्या दोन वर्षापासून या इमारतीत दवाखाना सुरू करण्यात आला नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात असून सद्यस्थितीत वैद्यकीय अधिका:यांच्या निवासस्थानात दवाखाना सुरू आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ओहवा या गावात आदिवासी जनतेच्या आरोग्याच्या सोयी-सुविधांसाठी लाखो रुपये खर्च करून दोन वर्षापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आलेली आहे. मात्र सदरच्या इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. इमारतीचा कोणता भाग केव्हा कोसळेल तेही सांगता येत नाही. पावसाळ्यात तर संपूर्ण इमारतीला गळती लागते. आतापासूनच भिंती, कॉलम, बीम त्यांना मोठमोठे तडे गेल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. इमारतीच्या मागचा भाग मोडकळीस आला आहे. तसेच खिडक्यांच्या काचा फुटून मोकळे झाले आहे. अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची व वापरण्याच्या पाण्यासाठी कुपनलिका नसल्याने संडास-बाथरुममध्ये वापरण्यासाठी पाण्याची व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. शासन आदिवासी जनतेला आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी करोडो रुपये खर्च करते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती अगदी विदारक दिसून येत आहे. याकडे कोणाचेही लक्ष वा नियंत्रण नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
ओहवा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दहेल, कुवा व खाई या तीन ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. मात्र दहेल येथील उपकेंद्रातील ए.एन.एम.ची बदली झाल्यापासून हे पद रिक्त आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी हे पदही रिक्त असल्याने गर्भवती महिला व प्रसुतीसंदर्भात अडचणी येतात. दहेल या गावाचा परिसर ओहवा प्राथमिक आरोग्य केंद्रापासून साधारणपणे 30 किलोमीटर अंतरावर असल्याने त्वरित रूग्णाला आरोग्याच्या सोयी-सुविधा पुरविण्यात अडचणी येतात. त्यामुळे दहेल उपकेंद्रातील वैद्यकीय अधिका:यासह इतर पदे त्वरित भरण्याची गरज आहे. ओहवा उपकेंद्रातही वैद्यकीय अधिका:याचे पद रिक्त आहे. तेही भरणे आवश्यक आहे. अपूर्ण कर्मचा:यांमुळे कार्यरत असलेल्या कर्मचा:यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडतो. अतिदुर्गम आदिवासी भागातील तातडीची व योग्य आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिका:यांनी ओहवा आरोग्य केंद्र इमारतीच्या बांधकामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व पुरेशा कर्मचा:यांची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.