‘नफरत की आग मे मेरा शहर जला..’

By admin | Published: June 16, 2017 01:19 PM2017-06-16T13:19:50+5:302017-06-16T13:19:50+5:30

पोलिसांची ढिलाई : शहाद्यातील खून राजकीय वैमनस्यातूनच

'Burn my city in the fire of hatred ..' | ‘नफरत की आग मे मेरा शहर जला..’

‘नफरत की आग मे मेरा शहर जला..’

Next

रमाकांत पाटील/ ऑनलाईन लोकमत 

शहादा,दि.16- ‘नफरत की आग मे मेरा शहर जला, अपनो ने अपनो को लूटा, किसका क्या गया भला..’ शहाद्यातील गरीब-नवाज कॉलनीतील महिलेची ही प्रतिक्रिया सुन्न करणारी आहे. पालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली यांचा खून आणि त्यानंतर तब्बल 24 तास शहरात सुरू असलेली जाळपोळीने सारी गरीब-नवाज कॉलनी हादरली आहे. दरम्यान, ही घटना राजकीय वैमनस्यातूनच घडल्याची प्रतिक्रिया असून पोलिसांनी सुरुवातीलाच या दोन्ही गटातील वादाकडे गांभीर्याने लक्ष न घातल्यानेच घटना घडल्याचे बोलले जात आहे.
शहाद्यातील गरीब-नवाज कॉलनी म्हणजे शहरातील भव्य विस्तारीत वसाहत. जवळपास शहरातील 30 टक्केपेक्षा अधिक भाग या वसाहतीत येतो. मुस्लीमबहुल वस्तीचा हा परिसर असून पालिका निवडणुकीपासून हा भाग अधिक चर्चेत आला. पालिका निवडणुकीतच याठिकाणी काँग्रेस आणि एमआयएममध्ये चुरशीची लढत झाली. याच चुरशीचे पडसाद गेले आठ महिने दोन्ही गटात वेळोवेळी उमटत आले. नगराध्यक्ष निवडीच्या दिवशी असो की एमआयएमची आभार सभा असो. या दोन्ही  गटातील वाद उफाळून आले. हाणामारीच्या  व दगडफेकीच्या घटना घडल्या. पण त्यावेळी केवळ समझोत्याची भूमिका त्या त्या पक्षाचे म्होरके म्हणा की पोलीस म्हणा यांनी घेतली. पण त्या समझोत्यातून वैमनस्य संपले नव्हते. 14 जूनला हे वैमनस्य क्षुल्लक कारणावरून उफाळून आले आणि त्याचा परिणाम बांधकाम सभापतीच्या खुनात झाला. या खुनानंतर मात्र दुस:या गटातील वैमनस्याची भावना अधिक पेटली आणि त्यातून घरांची, दुकानांची जाळपोळ, लुटालूट सुरू झाली.
शहाद्यातील गरीब-नवाज कॉलनीतील गेले 24 तास म्हणजे अक्षरश: युद्ध भूमी बनली होती. रॉकेल-पेट्रोलचे बॉम्ब, दगड-विटा, धारदार शस्त्रे घेऊन समाजकंटक राजरोसपणे काही निवडक घरे व दुकाने जाळत होते. 50 ते 100 युवकांची टोळी सातत्याने हेच           काम करीत होते. बुधवारच्या  घटनेनंतर गुरुवारीदेखील दुपार्पयत तोंडावर कपडे बांधून काही  युवकांनी जाळपोळ करून नंगानाच केला.
गेल्या 24 तासात गरीब-नवाज कॉलनीतील 25 पेक्षा अधिक घरे जाळण्यात आली. दोन कार, दोन ट्रॅक्टर, मोटारसायकलीही जाळण्यात आल्या. दुकाने आणि गोडावूनचीही नासधूस करण्यात आली. जी घरे जाळली त्या घरात कुठलाही सामान शिल्लक राहिला नाही. गुरुवारी दुपारी जेव्हा या परिसरात भेट दिली त्यावेळी जाळलेल्या घरांमध्ये लहान-लहान मुले तेथील भंगार गोळा करीत होते. एकूणच शहाद्यातील ही घटना खरोखरच सुन्न करणारी आहे.
यासंदर्भात या परिसरात फेरफटका मारला असता टोळक्या-टोळक्याने लोक जमा झालेले दिसले. महिलादेखील समूहातच होत्या. घडलेल्या घटनेबाबत कोणीही काही बोलायला तयार नव्हते. सारे काही अबोल झाल्यागत स्थिती होती. प्रचंड दहशत या भागातील लोकांमध्ये दिसून आली. या वसाहतीत  बसलेल्या एका महिलांच्या समूहाशी चर्चा केली असता कुणी काही बोलले नाही पण एका महिलेने सहजपणे उद्गारलेले शब्द मात्र खरोखरच सर्व हकीगत सांगणारे ठरले. ‘नफरत की आग मे सारा शहर जला, अपनोनेही अपनो को लूटा, किसका क्या गया भला..’

Web Title: 'Burn my city in the fire of hatred ..'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.