नंदुरबारात पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 07:31 PM2019-03-26T19:31:49+5:302019-03-26T19:32:01+5:30
टंचाई : टँकर व जार पुरवठा करणाऱ्यांना मागणी
नंदुरबार : पाणी टंचाईची तीव्रता जशी वाढत आहे तसे पाणी विक्री करणाऱ्यांचे देखील फावत आहे. विशेषत: टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्यांना मोठी मागणी वाढली आहे. सध्या पाच हजार लिटरचे टँकर पाचशे रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. शुद्ध आणि गार पाण्याचे जार पुरविणाºयांकडेही मागणी वाढली आहे.
नंदुरबार शहरालगत परंतु नगरपालिका हद्दीत नसलेल्या अनेक नवीन वसाहतींमध्ये तसेच लगतच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. कुपनलिका, विहिरी कोरड्या झाल्या आहेत. काही कुपनलिकांच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि पाण्याचा स्त्रोतच नसल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी देखील अशा कुपनलिकांना येवू लागले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी टँकरने पाणी पुरवठा करणाºयांचे चांगलेच फावले आहे. नंदुरबार शहर आणि लगतच्या परिसरात दररोज किमान ५० पेक्षा जास्त खाजगी टँकरच्या फेºया होत असल्याचे एका टँकर चालकाने सांगितले.
५०० रुपये दर
एका टँकरला अर्थात पाच हजार लिटर क्षमतेच्या एका टँकरसाठी किमान ५०० रुपये मोजावेल लागत आहे. येत्या काळात मागणी वाढल्यानंतर त्यात काहीअंशी वाढ करण्याचे सुतोवाच टँकर चालक, मालक यांनी व्यक्त केली आहे. पाच हजार लिटर पाणी साठवण्याची सोय नसलेले नागरिक दोन किंवा तीनजण मिळून एक टँकर पाणी मागवत आहेत. महिन्याला विकतच्या पाण्यासाठी किमान तीन ते चार हजार रुपये मोजावे लागत आहे. पाच हजार लिटर क्षमतेच्या टँकरमध्ये पुर्ण क्षमतेचे पाणी असतेच असे नाही. वाहतूक करतांना काही प्रमाणात पाणी वाया जात असतेच.
फिल्टर प्लान्ट चालकही तेजीत
फिल्टर पाणी जार पुरवठा करणाºयांचाही धंदा सध्या चांगलाच तेजीत आला आहे. गेल्या महिनाभरापासून मागणी वाढली असल्याचे या क्षेत्रातील व्यावसायिकांनी सांगितले. नियमित ग्राहकांसह ज्यांच्या घरी कार्यक्रम, लग्न सोहळा आहे अशा ठिकाणी अतिरिक्त जार पुरवावे लागत आहेत. सध्या २० रुपये प्रतीनग जार अशा पद्धतीने पुरवठा केला जात आहे. सर्वच विक्रेत्यांची सेवा ही घरपोच आहे. १०० पेक्षा अधीक जारची मागणी असेल तर दरात सूट दिली जात आहे. नंदुरबारात गेल्या दोन वर्षात फिल्टर प्लान्टची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
पालिकेचे मशीन बंद
पालिकेने पाच ते सहा ठिकाणच्या चौकात फिल्टर पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. पाच रुपयाच्या कॉईन टाकल्यावर पाच लिटर पाणी मिळविण्याची सोय त्यात आहे. अनेकांनी ते सोयीचे ठरले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यातील अनेक मशीन बंद अवस्थेत आहेत. सरू करण्याची मागणी आहे.शहरात पाणी टंचाईची तीव्रता वाढली असतांना पालिकेने शहरालगतच्या काही वसाहतींसाठी संबधीत ग्रामपंचायतींना मिटरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात ज्या ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठ्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही अशा ठिकाणीच पालिकेने पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात शहरवासीयांच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही असे पालिकेने स्पष्ट केले आहे.