चिंचपाडय़ात वीजबिल तक्रार निवारण शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 01:53 PM2019-11-30T13:53:59+5:302019-11-30T13:54:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील विसरवाडी व चिंचपाडा भागात वीज वितरणच्या ग्राहकांना अवास्तव वीजबिले दिले जात असल्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील विसरवाडी व चिंचपाडा भागात वीज वितरणच्या ग्राहकांना अवास्तव वीजबिले दिले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारी लोकमतने प्रसिद्ध करीत संबंधितांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्याची दखल घेत चिंचपाडा येथे तक्रार निवारण शिबीर घेण्यात आले.
वीज वितरणमार्फत चिंचपाडा येथे बहुसंख्य ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात आल्या. परंतु या ग्राहकांना नेहमीच अवास्तव वीज बिले दिले जात होते, त्यानुसार नागरिकांमार्फत तक्रारी करण्यात येत होत्या. त्यात रिडींग घेतले जात नाही, वीजबिले मिळत नाही, अवाजवी बिले दिली जातात, अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. या सेवेला कंटाळलेल्या नागरिकांनी रोस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता. नागरिकांच्या या तक्रारी लोकमतमधून प्रसिद्ध करीत वीज वितरण कंपनीच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या, त्याची दखल वीज वितरणमार्फत घेण्यात आली.
नागरिकांच्या या समस्या सोडविण्यासाठी चिंचपाडा येथे वीजबिल तक्रार निवारण शिबीर घेण्यात आले. या शिबीरात एकुण 22 ग्राहकांमार्फत तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यात जयवंती श्रीकांत पाडवी, वसंत दामजी वसावे, वसंत कर्मा वळवी, नथ्थू पितांबर महाले, भिमसिंग देवला गावीत, विठ्ठल कांतीलाल वसावे, संतोष दत्तू वसावे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. हे शिबीर वीज वितरणचे कार्यकारी अभियंता वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले असून विसरवाडीचे सहाय्यक अभियंता अशोक पाटील, वायरमन दानियल गावीत यांनी घेतले. नागरिकांच्या तक्रारीनुसार त्या-त्या ग्राहकांच्या मिटरची तपासणी देखील करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांमरररध्ये काही अंशी समाधान व्यक्त करण्यात आले.