संगणकीकृत सातबारा दुरुस्तीसाठी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:21 AM2021-07-16T04:21:52+5:302021-07-16T04:21:52+5:30
प्रकाशा : संगणकीकृत सातबाऱ्यामधील चुका दुरुस्त करण्यासाठी एक दिवसीय शिबिराचे आयोजन प्रकाशा येथील तलाठी कार्यालयामध्ये गुरुवारी करण्यात आले होते. ...
प्रकाशा : संगणकीकृत सातबाऱ्यामधील चुका दुरुस्त करण्यासाठी एक दिवसीय शिबिराचे आयोजन प्रकाशा येथील तलाठी कार्यालयामध्ये गुरुवारी करण्यात आले होते. त्यात साधारण ३०० लोकांनी दुरुस्तीसाठी अर्ज केले आहेत. शहादा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचा मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी धर्मराज पाटील यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, समाजिक कार्यकर्ते राम पाटील, दशरथ पाटील, प्रमोद सामुद्रे, प्रवीण पाटील, संजय पाडवी, मोहन चौधरी आदी उपस्थित होते.
या वेळी संगणकीकृत सातबाऱ्यामध्ये ज्या चुका झाल्या आहेत त्या दुरुस्तीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत नाव, आडनाव, दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी अर्ज केले. तसेच फेर नंबर टाकणे, बोज्यात दुरुस्ती करणेसाठी ग्रामस्थांनी अर्ज केले आहेत.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार दुरुस्ती करण्यात आली.
याअगोदर काही लोकांनी अर्ज केले होते ते आणि गुरुवारी ज्या लोकांनी अर्ज केले त्यांच्या दुरुस्तीचे अर्ज स्वीकारले आहेत. आणि ज्यांची दुरुस्ती झाली आहे त्यांची चावडीवाचनदेखील करण्यात आले. याप्रसंगी गावातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
या शिबिरामुळे लोकांचे शहादापर्यंत जाणे टळले आहे. शिवाय एकाच दिवसात हे सर्व काम झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.