चेतक फेस्टीवलचे करार रद्द केल्याने फेस्टीवलबाबत प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 12:15 PM2019-12-03T12:15:45+5:302019-12-03T12:15:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : राज्यात अश्व खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रेतील अश्व शौकिनांचे प्रमुख आकर्षण असलेल्या चेतक फेस्टिवलचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : राज्यात अश्व खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रेतील अश्व शौकिनांचे प्रमुख आकर्षण असलेल्या चेतक फेस्टिवलचे भवितव्य अंधारात आले आहे. या महोत्सवाच्या आयोजनाबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सादर केलेल्या करारास नियोजन व वित्त विभागाने शासनाची मान्यता घेतलेली नसल्याचे तसेच केंद्र शासनाच्या धोरणानुसार हा करार झाला नसून लल्लूजी अॅण्ड सन्स यांच्यासोबत केलेले सर्व करार रद्द केले आहेत. विशेष म्हणजे 2017 ला दहा वर्षासाठी हा करार करण्यात आला असून 2027 र्पयत यावर राज्य शासन 83 कोटी रूपये खर्च करणार होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून घोडय़ांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रोत्सवाला 11 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. गेल्या दोन वर्षापासून चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून या यात्रेने आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव केले होते. चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून अश्व शौकिनांसह अश्वांची खरेदी व विक्री करणा:यांना दज्रेदार सुविधा मिळाव्यात, यात्रोत्सवात येणा:या देशविदेशातील पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. यासाठी तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या अखत्यारीत असलेल्या पर्यटन विकास महामंडळाने गुजरातमधील लल्लूजी अॅण्ड सन्स या कंपनीसोबत 10 वर्षाचा करार केला व यापोटी 83 कोटी रुपये राज्य शासन अदा करणार होते. 2017-18 या दोन वर्षाच्या कालावधीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चेतक फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले.
यासाठी राज्य शासनाने पहिल्या वर्षी चार कोटी 17 लाख रुपये तर यापुढील प्रत्येक वर्षात सुमारे दोन कोटी 25 लाख रूपये वाढीव खर्च अपेक्षित धरून 10 वर्षासाठी 83 कोटी रूपयांचा करार केला. या करारानुसार यात्रा कालावधीत संपूर्ण महिनाभर चेतक फेस्टिवल चालणार असून, सुरूवातीच्या महिनाभराच्या कालावधीत मिळणारे उत्पन्न हे लल्लूजी अॅण्ड सन्स घेईल तर त्यानंतरच्या कालावधीत जेवढे दिवस यात्रा चालेल त्यातील एकूण उत्पन्नापैकी 10 टक्के उत्पन्न राज्य शासनाला मिळणार होते. प्रारंभीच्या काळापासूनच हा करार वादाच्या भोव:यात सापडला होता. मात्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी व पर्यटनमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष करीत हा महोत्सव व करार अंमलात आणला.
यंदा 11 डिसेंबरपासून सारंगखेडा यात्रेला सुरूवात होणार असून, चेतक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याने राज्याच्या पर्यटन विकास महामंडळाने करारनाम्यानुसार 2019 साठी चेतक महोत्सवाच्या आयोजनाबाबत व निधी मिळण्याबाबत 20 नोव्हेंबर 2019 ला राज्याच्या पर्यटन विभागाशी पत्रव्यवहार केला. यावर पर्यटन विभागाचे कक्ष अधिकारी एस.एन. लांबाते यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना 28 नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून सारंगखेडा यात्रेदरम्यान चेतक महोत्सवाबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने लल्लूजी अॅण्ड सन्स यांच्यासोबत केलेला करार तसेच त्या अनुषंगाने देण्यात आलेले सर्व आदेश तत्काळ रद्द करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. हे सर्व आदेश रद्द करताना कक्ष अधिका:यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या करारानुसार निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव नियोजन व वित्त विभागात मान्यतेसाठी सादर केला असता वित्त विभागाने हा प्रस्ताव अमान्य केला आहे. सदरचा करार हा राज्य शासनाची मान्यता घेतलेली नाही त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या धोरणानुसार नाही. परिणामी लल्लूजी अॅण्ड सन्स यांच्यासोबत केलेला करार हा रद्द करण्याशिवाय पर्याय नसल्याचा अभिप्राय दिला असून, परिणामी हा करार रद्द करण्यात येत आहे.
2017 ला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने चेतक महोत्सवाच्या आयोजनासाठी लल्लूजी अॅण्ड सन्स या कंपनीसोबत 10 वर्षाचा करार केला. यातील पहिल्या वर्षाचा खर्च हा सुमारे चार कोटी 17 लाख रूपये 2017 सालच्या पर्यटन विभागाच्या शिल्लक अनुदानातून देण्यात आला. 2018 च्या निधीसाठी पर्यटन विकास महामंडळाने पर्यटन विभागाकडे मागणी केली होती. विशेष म्हणजे या दोन्ही वर्षात यात्रा संपूर्ण महिनाभराच्या कालावधीत चालली नसल्याने परिणामी चेतक महोत्सवही महिनाभराच्या आतच संपला. करारातील अटीनुसार एक महिन्यानंतरच्या उत्पन्नावर राज्य शासनाला 10 टक्के हिस्सा येणार असल्याने या दोन्ही वर्षात राज्य शासनाला एकूण उत्पन्न हे शून्य मिळाले. त्यामुळे दोन वर्षात जो खर्च राज्य शासनाने केला तो वायफळ ठरला असल्याची चर्चा आता सुरू आहे.