दररोज व्याजाचे ३ हजार भरूनही कुटुंबाचा छळ करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल
By भूषण.विजय.रामराजे | Published: April 7, 2023 04:00 PM2023-04-07T16:00:51+5:302023-04-07T16:01:25+5:30
तब्बल वर्षभर दररोज तीन हजार रुपयांचे व्याज भरूनही कुटुंबाचा छळ करणाऱ्या सहा जणांविरोधात नंदुरबारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूषण रामराजे, नंदुरबार : तब्बल वर्षभर दररोज तीन हजार रुपयांचे व्याज भरूनही कुटुंबाचा छळ करणाऱ्या सहा जणांविरोधात नंदुरबारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२२ पासून हा प्रकार सुरू होता. शहरातील जयहिंद काॅलनीतील राम मोहनदास नाथानी यांनी सुनील बाबूराव पाटील (रा. शाहूनगर) याच्याकडून एक वर्षापूर्वी २ लाख रुपये घेतले होते. दररोज १ हजार ५०० रुपयांचे व्याज देण्याच्या बदल्यात हे पैसे घेण्यात आले होते.
दरम्यान, मोहन सोमा सोनवणे (रा. मिशन हायस्कूलजवळ) याच्याकडून राम नाथानी यांनी २ लाख रुपये घेत दिवसाला १ हजार २०० रुपयांचे व्याज देण्याचे निश्चित केले होते. तसेच सावंत सोनवणे (रा. मिशन हायस्कूलजवळ) याच्याकडून १५ हजार रुपये, कैलास सोनवणे, मनोज चाैधरी यांच्याकडून ३५ हजार रुपये तर मनोज आविळे याच्याकडून ५ टक्के व्याजाने ३० हजार रुपये घेतले होते. या बदल्यात राम नाथानी यांनी सुनील पाटील याला २ सह्या केलेले धनादेश, मोहन सोनवणे याला चार सह्या केलेले धनादेश आणि १०० रुपयांचे सह्या केलेले मुद्रांक असे दिले होते. दरम्यान, काही काळानंतर नाथानी याने सुनील पाटील व मोहन सोनवणे या दोघांना प्रत्येकी १ लाख रुपये परत केले होते.
दरम्यान, उर्वरित चाैघांनाही त्यांच्याकडून घेतलेले व्याजाचे पैसे पूर्णपणे परत करण्यात आले होते. परंतु, पैसे मिळाल्यानंतरही संबंधितांनी वारंवार नाथानी याच्या घरी जाऊन दमदाटी करत व धमकी देत पैशांची मागणी केली होती. यामुळे नाथानी कुटुंबीय दहशतीत होते. यातून नाथानी यांच्या पत्नी कोमल राम नाथानी यांनी पोलिसात धाव घेतली होती. गुरुवारी सायंकाळी त्यांनी उपनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अवैध सावकारी करणारा सुनील बाबूराव पाटील (४५), मोहन सोमा सोनवणे (४२), सावंत सोनवणे (४५), कैलास सोनवणे (३८), मनोज चाैधरी (४०) आणि मनोज आविळे (३६) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण कोळी करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"