पोलिस भरतीसाठी बोगस क्रीडा प्रमाणपत्र, परभणीच्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
By मनोज शेलार | Published: September 3, 2023 07:35 PM2023-09-03T19:35:10+5:302023-09-03T19:36:11+5:30
अजय सखाराम ढापसे (२८) रा.पोखर्णी, ता.गंगाखेड, जि.परभणी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित युवकाचे नाव आहे.
नंदुरबार : जिल्हा पोलिस दलात २०१७ मध्ये झालेल्या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेत परभणी जिल्ह्यातील युवकाने क्रीडाचे बोगस प्रमाणपत्र सादर करीत पाच टक्के अतिरिक्त गुण मिळविले. त्यानुसार त्याची गुणवत्ता यादीत निवडही झाली होती; परंतु पोलिस दलाने केलेल्या पडताळणीत ते बोगस आढळल्याने त्याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय सखाराम ढापसे (२८) रा.पोखर्णी, ता.गंगाखेड, जि.परभणी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित युवकाचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनुसार, नंदुरबार जिल्हा पोलिस दलात २०१७ मध्ये पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. भरतीसाठी क्रीडाचे पाच टक्के गुण अतिरिक्त मिळत असतात. या अतिरिक्त गुणांसाठी ढापसे यांनी रग्बी फुटबॉल खेळाचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यानुसार त्यांना पाच टक्के अतिरिक्त गुण मिळाले होते. त्यामुळे त्यांचे नाव गुणवत्ता यादीत आले होते; परंतु त्यांची भरती झाली नव्हती.
पोलिस दलाने ढापसे यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी पाठविले होते. ते बोगस असल्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपीक संदेश रमेश तमखाने (३६) यांनी फिर्याद दिल्याने अजय ढापसे यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहेत.