नवापूर पूरग्रस्तांच्या मदतीत झळकतोय जातीय सलोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:43 PM2018-08-24T12:43:35+5:302018-08-24T12:43:40+5:30
नवापूर : रंगावली नदीच्या पुरामुळे घर-संसार वाहून गेलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीला जिल्ह्यातील सर्वधर्मिय नागरिक धावून आले आहेत़ या मदत कार्यामुळे जातीय सलोखा जपला जात आह़े विविध धार्मिक, सामजिक संघटनांसह प्रशासकीय अधिकारी मदतकार्याला दरदिवशी वेग देत आहेत़
जमियते उल्मा-ए-हिंद
जमियते उल्मा-ए-हिंद च्या नवापूर शाखेकडुन रंगावलीच्या महापुरात बेघर झालेल्या नागरीकांना संसारोपयोगी सामान व शिधा वाटप करण्यात आले. मदरसा हॉल येथे सर्व समाजाच्या नागरीकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. अतिवृष्टीत शहरातील बेघर झालेल्या 135 लोकांना संसार उपयोगी वस्तु भांडी सेट, कंबल, सतरंजी, चटई व एक महिना पुरेल एवढा अन्नसाठा अक्कलकुवा जामियाचे प्रमुख मौलाना गुलाम वस्तानवी यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. यावेळी तहसीलदार राजेंद्र नजन, पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, उपनगराध्यक्ष अय्युब बलेसरीया, बांधकाम सभापती हारुन खाटीक, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक आरीफ बलेसरिया, खलील खाटीक, हाजी मुसाजी व्होरा, मौलाना रऊफ मन्यार, युसुफ कायदावाला, सोहेब मांदा, रऊफ शेख, सोहेल बलेसरीया, युसुफ बलेसरीया, राशीद शेख, परवेज सैय्यद, रसुल पठाण, एजाज खाटीक, परीट समाजाचे प्रदेश सहसचिव महेंद्र जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील, भाजपचे एजाज शेख, माजी नगरसेवक अजय पाटील, एम. आय. एम.पक्षाचे तोसिफ आमलीवाला, सोहेब शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमात महापुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या 50 वर्षीय वृध्दाचा जीव वाचवणा:या दोघा युवकांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच मदतकार्यात वाटा म्हणून सात वर्षीय चिमुकला रोमान शेख याने बकरी ईदचे कपडे घेण्यासाठी गोळा केलेली रक्कम दिली़ ही रक्कम त्याने कामी मौलाना वस्तानवी यांच्या कडे सोपविली.
कार्यक्रमात बोलताना मौलाना गुलाम वस्तांनवी म्हणाले की, जमीयत ही एक सामाजीक संस्था आहे. एकतेचा संदेश देत गोरगरीबांना मदत करण्यास सदैव तत्पर असत़े
विजयसिंह राजपूत यांनी संकटात मदत करणे म्हणजे धीर देण्यासारखे आहे. हे मदतकार्य करुन माणूसपण जपण्याचा संदेश दिला जात असल्याचे सांगितल़े नरेंद्र नगराळे, हसमुख पाटील, एजाज शेख यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रऊफ शेख यांनी केले.
फिलाडेल्फिया व फेथ चर्च
तालुक्यातील करंजी खुर्द येथील फिलाडेलफिया व फेथ चर्च किलवनपाडा यांच्यातर्फे रंगावली नदी किनारी असलेल्या फुलफळी येथे राहणा:या आदिवासी बांधवाना धान्य व कपडे वाटप करण्यात आले. पंचायत समिती उपसभापती दिलीप गावीत, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पंचायत समिती सदस्य जालमलिंग गावीत, पाश्टर राजु गावीत, माजी नगरसेवक विनय गावीत, सरपंच फुलसिंग गावीत, जैनु गावीत, दिपक मावची, शैलेश मावची, भिकु मावची यांच्या हस्ते पूरग्रस्तांना धान्य आणि कपडे वाटप करण्यात आले.
लायन्स क्लब नंदुरबार
नवापूर येथील पूरग्रस्तांना नंदुरबार येथील लायन्स क्लबतर्फे पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आल़े लायन्स क्लबने गरजू लोकांना भांडी व धान्य वाटप केले. यावेळी लायन्स क्लबचे डिस्ट्रीक्ट को-ऑर्डीनेटर विलास चौधरी, लायन्सचे अध्यक्ष अनिल पाटील, सचिव मयुर राजपूत, प्रोजेक्ट चेअरमन सतिष चौधरी, झोन चेअरपर्सन आनंद रघुवंशी, नरेश नानकानी, चेतन परदेशी, सुदेश रघुवंशी आदी उपस्थित होते.