सरपंचांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करून केले जप्त
By मनोज.आत्माराम.शेलार | Published: April 26, 2023 07:41 PM2023-04-26T19:41:29+5:302023-04-26T19:42:20+5:30
नवापूर तालुक्यातील मोठे खातगाव ग्रामपंचायतीचे सरपंच यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचे आदेश जात पडताळणी समितीने दिले आहेत.
मनोज शेलार, नंदुरबार : नवापूर तालुक्यातील मोठे खातगाव ग्रामपंचायतीचे सरपंच यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचे आदेश जात पडताळणी समितीने दिले आहेत.
डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठे खातगाव येथील सुमा पारतू वळवी उर्फ सुमा किसन वळवी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राप्त केलेले जातीचे दाखले, जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करून निवडणुकीत उमेदवारी केली. या निवडणुकीत त्या निवडूनही आल्या होत्या. याबाबत खातगाव येथील तेजस्विता शिरीष वसावे यांनी नवापूर तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आलेले दाखले रद्द करून जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
आदेशात नमूद वस्तुस्थितीवरून सुमा पारतू वळवी यांनी समितीस सादर केलेले भिल, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र हे विहीत पद्धतीचा अवलंब करून मिळविलेले नसल्याने तसेच सक्षम प्राधिकारी, उपविभागीय अधिकारी, नंदुरबार यांनी सदर अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र निर्गमित केलेले नसल्याने तथाकथित भिल, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. समिती समोर सादर केलेले जमातीचे प्रमाणपत्र विहीत पद्धतीचा अवलंब करून प्राप्त केलेले नसल्याने ते पडताळणीत खोटे व बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सुमा पारतू वळवी यांना समितीमार्फत निर्गमित वैधता प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचे आदेशित केले आहे.
त्यांनी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव असलेल्या जागेवर खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर मिळविलेले वैधता प्रमाणपत्राचा वापर केलेला असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) २०००च्या कलम १० व ११ मधील तरतुदीनुसार कारवाई करावी, असे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"